मार्गदर्शकाची भूमिका विसरणे अशक्य
डॉ. आहेर : बाळासाहेब मगर यांची शोकसभा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.९: बाळासाहेब मगर यांनी आपल्या गावाशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. आहेर कुटुबियांसाठी त्यांची मार्गदर्शक म्हणून असलेली भूमिका कधीही विसरू शकत नसल्याचे मनोगत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी व्यक्त केले.
राजलक्ष्मी बँकेचे कार्यकारी संचालक व नाशिक कवी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मगर यांचे शनिवारी (ता.५) निधन झाले. त्यांच्या श्रध्दांजली सभेत बोलतांना आहेर भावूक झाले होते. भावबंधन मंगल कार्यालयात (ता.९) सकाळी श्रद्धांजलीपर शाेकसभा झाली. सभेत नाशिक कवीचे कार्याध्यक्ष सुभाष सबनीस यांनी मगर यांची आठवण चिरंतन रहावी म्हणून यावर्षीपासून संस्थेच्या वतीने बाळासाहेब मगर राज्यस्तरीय विनोदी कविता लेखन स्पर्धा घेणार असल्याचे जाहीर केले. कृष्णभूषण महाशब्दे यांनी मगर यांच्या समवेतच्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. निलिमा पवार यांनी कौटुंबिक संबधांना उजाळा दिला.
या वेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, के.के.वाघ एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, डॉ. विलास पाटील, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष सुनील ढिकले, नाट्य व्यावसायिक जयप्रकाश जातेगावकर, डॉ.दिनेश बच्छाव यांनी बाळासाहेब मगर यांच्याविषयी आठवणी जागविल्या. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.