फोटो : 29246
नाशिक : आदिवासी विकास मंत्री प्रा.उईके यांनी पाठविलेला चर्चेचा प्रस्ताव धुडकावताना प्रशांत गावंडे, प्रभाकर फसाळे, ललितकुमार चौधरी.
…
‘मिशन मुंबई’वर ठाम; मंत्र्यांचा चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
आदिवासी वसतिगृह सुविधांसाठी २४ दिवसांचे आंदोलन; कमी वेळेत मुंबईत कसे पोहोचायचे, आंदोलकांचा सवाल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.९ : आदिवासी वसतिगृहांतील असुविधा व विविध मागण्यांसाठी गेल्या २४ दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या आदिवासी युवकांनी आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांचा चर्चेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. अल्पावधीत मुंबईत चर्चेसाठी पोहोचणे शक्य नसल्याचे सांगत आंदोलकांनी आता ‘मिशन मुंबई’ सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटनेबरोबरच वसतिगृहांतील मूलभूत सुविधा, डोनेशनप्रथा आणि डीबीटी योजना बंद करण्याच्या मागणीसाठी १७ ऑगस्टपासून आंदोलन सुरू आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून मंत्री उईके यांनी राजीनामा द्यावा, तसेच आंदोलकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या विभागीय सचिव वाघमारे आणि आयुक्त लीना बनसोड यांना तत्काळ हटवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
आंदोलनाला विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून, २४ दिवस उलटूनही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, मंत्री उईके यांनी निवडक पाच प्रतिनिधींना बुधवारी सायंकाळी सहा वाजता मुंबईत चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. मात्र, प्रस्ताव दुपारी मिळाल्याने इतक्या कमी वेळेत मुंबईत पोहोचणे कसे शक्य आहे, असा सवाल करत आंदोलकांनी प्रस्ताव फेटाळला.
आता गणेशोत्सव काळात मुंबईत आंदोलन नेण्याची तयारी सुरू असून, नंदुरबार, पालघर, नाशिक, ठाणे आणि अमरावती येथील आदिवासी बांधवांना मोर्चात सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
यावेळी प्रशांत गावंडे, प्रभाकर फसाळे, ललितकुमार चौधरी, सोनू गायकवाड, विकी मुंजे, सागर पावरा, लक्ष्मी जाधव, विवेक गावित, राहूल पावरा आदी उपस्थित होते.
९० टक्के मागण्या मान्य, मग चर्चा कशासाठी?
मंत्री प्रा. उईके यांनी पाठविलेल्या पत्रात आंदोलकांच्या ९० टक्के मागण्या पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मागण्या मान्य झाल्या असतील तर चर्चेची गरज काय, असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी चर्चेचा प्रस्ताव धुडकावून लावला.
कोट
मंत्र्यांनी चर्चेचा प्रस्ताव बुधवारी दुपारी पाठविला आणि सायंकाळी मुंबईत उपस्थित राहण्यास सांगितले. इतक्या कमी वेळेत मुंबईत कसे पोहोचायचे? तसेच ज्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे, त्यांच्याशी काय चर्चा करणार?
- प्रभाकर फसाळे, आंदोलनकर्ते