विकासकामांच्या हिशोबावरून
ग्रामसभा तब्बल साडेतेरा तास!
गोंदुणे ग्रामस्थांचा खर्चाचा तपशील व कागदपत्रांसाठी आग्रह
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : ग्रामपंचायतीने गेल्या चार वर्षांत केलेल्या विकासकामांचा आणि त्यावरील खर्चाचा सविस्तर हिशोब मागण्याच्या मुद्द्यावर सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे गावातील ग्रामसभा तब्बल साडेतेरा तास चालली. मात्र, एवढ्या प्रदीर्घ चर्चेनंतरही ग्रामस्थांना समाधानकारक माहिती न मिळाल्याने हा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही.
गोंदुणे येथे २५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सन २०२२ पासून आजपर्यंत गावात करण्यात आलेल्या सर्व विकासकामांचा तसेच त्यावरील खर्चाचा सविस्तर हिशोब मागितला होता. यासंदर्भातील माहिती सादर करण्यासाठी ग्रामपंचायतीने ८ सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली ग्रामसभा रात्री ११.३० वाजेपर्यंत चालली. गेल्या चार वर्षांतील विकासकामे, त्यासाठी झालेला खर्च आणि संबंधित कागदपत्रांचा तपशील हा ग्रामसभेतील चर्चेचा मुख्य व सर्वाधिक वेळ चाललेला विषय ठरला. ग्रामस्थांनी प्रत्येक कामाचा स्वतंत्र तपशील, खर्चाची माहिती आणि त्यासंबंधीची कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी लावून धरली.
मात्र, दिवसभर चाललेल्या चर्चेनंतरही अपेक्षित व समाधानकारक माहिती मिळू शकली नाही. बुधवारी आवश्यक माहिती देण्यात येईल, असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरीही ग्रामस्थांच्या हाती स्पष्ट माहिती न लागल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामपंचायतीला सन २०२२ पासून आजपर्यंतच्या सर्व विकासकामांचा संपूर्ण हिशोब तसेच संबंधित कागदपत्रे तातडीने सार्वजनिक करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.