धुळे ः टुडे ३ साठी, मेन
---
फोटो क्रमांक ः 29250 व 29251
--
‘आरटीओं’चेही दुर्लक्ष का?
--
विनानंबर प्लेट डंपर, हायवाने अवैध गौणखनिज वाहतूक
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ९ : राज्यात सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक असतानाही, वाळू, डबर व मुरूम यांसारख्या गौणखनिजांचे तस्कर हा नियम बेडरपणे पायदळी तुडवत आहेत. एकाच नंबर प्लेटचा वापर करून किंवा विनानंबर प्लेटच्या डंपर, हायवा आणि ट्रॅक्टरद्वारे अवैध व ‘ओव्हरलोड’ वाहतूक केली जात आहे. सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या यंत्रणांचे अशा बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांकडे होत असलेले दुर्लक्ष चीड आणणारे आहे. याप्रकरणी पोलिस, आरटीओ यंत्रणांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, त्रस्त ग्रामस्थांमधून रोष व्यक्त होत आहे. शासनाने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी आहे.
--
शासनाच्या वाळू धोरणानुसार १० जून ते ३० सप्टेंबरपर्यंत वाळू उत्खननास सक्त बंदी आहे. असे असतानाही जिल्ह्यातील पांझरा, बुराई आणि तापी नदीपात्रातून दिवसाढवळ्या आणि प्रामुख्याने रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू आहे. न्याहळोद, कौठळ, आनंदखेडे, नेर, कुसुंबा (ता. धुळे), चिमठाणे, शेवाडे, अक्कडसे, बेटावद- मांडळ, वालखेडा (ता. शिंदखेडा), दातर्ती शिवार (ता. साक्री), तसेच उपरपिंड व थाळनेर-मांजरोद परिसरातून गौणखनिजाची चोरी व अवैध वाहतूक अविरत सुरू आहे. याशिवाय मुरूम आणि डबरची तस्करीही जोमात आहे. मात्र, हा गैरप्रकार रोखण्यात महसूल, पोलिस आणि प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभाग यशस्वी ठरल्याचे दिसून आलेले नाही.
--
कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
गौणखनिज तस्करांची हिंमत इतकी वाढली आहे, की ते नियमांना उघडपणे आव्हान देत आहेत. टोलनाके किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर चुकवण्यासाठी तस्कर जाणीवपूर्वक वाहनांच्या नंबर प्लेट काढून टाकतात किंवा एकाच नंबरचा वापर अनेक वाहनांवर करतात. या प्रकारामुळे केवळ शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत नसून रस्ते सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. निर्धारित क्षमतेपेक्षा कैक पटीने अधिक (ओव्हरलोड) वजन वाहून नेणाऱ्या या अवजड वाहनांमुळे ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे, तर दुसरीकडे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक पातळीवर कारवाई होत नसल्याने ‘आरटीओ’चे ‘वायुवेग पथक’ नेमके काय करते? आणि महामार्गावरील वाहतूक पोलिस गस्ती पथकांना ही वाहने का दिसत नाहीत? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
---
१४-१
...चौकट...
१४-१
‘एचएसआरपी’ नियमांचा उघडपणे भंग
वाळू, मुरूम आणि डबरची वाहतूक करणारे हायवा व डंपर हे व्यावसायिक व अवजड वाहनांच्या श्रेणीत येतात. राज्याच्या नवीन वाळू उपसा धोरणानुसार आणि परिवहन विभागाच्या नियमांनुसार या वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसवणे सक्तीचे आहे. विशेषतः अवैध वाहतूक रोखण्यासाठी नंबर प्लेटची अचूकता अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी व्यावसायिक वाहनांना पिवळ्या रंगाची ‘एचएसआरपी’ प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. असे असतानाही जिल्हाभरात विनानंबर प्लेटच्या आणि एकाच नंबर प्लेटवर धडधाकड फिरणाऱ्या डंपर व हायवांवर आरटीओ आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई का केली जात नाही, हे सामान्यांसाठी अद्यापही कोडेच आहे.