जिल्ह्यात १३ मंडळांत पावसाची मोठी ओढ
मॉन्सूनचा लहरी खेळ; सात मंडळांत सरासरीच्या निम्म्याहून कमी पाऊस
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : मॉन्सूनचे सव्वातीन महिने संपत आले तरी जिल्ह्यात पावसाचा लहरीपणा कायम आहे. जिल्ह्यातील १३ महसुली मंडळांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून, त्यापैकी सात मंडळांमध्ये सरासरीच्या निम्म्याहूनही कमी पाऊस झाला आहे. परिणामी शेतीपिकांवर परिणाम होण्याबरोबरच पुढील काळात पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथे आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत सर्वांत कमी, अवघ्या २६.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथे केवळ २९.५ टक्के पाऊस झाला आहे.
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो, वाडीवऱ्हे, टाकेद, धारगाव आणि घोटी, तसेच मालेगाव तालुक्यातील कौळाणे, सौंदाणे, मालेगाव, दाभाडी आणि जळगाव निंबाईत या मंडळांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे येवला तालुक्यातील आंगणगाव, कळवणमधील भारदी आणि नांदगाव तालुक्यातील बाणगाव या मंडळांमध्येही पर्जन्यमान कमी आहे.
सात मंडळांची चिंता
नांदगाव सदो : २६.६ टक्के
कौळाणे : २९.५ टक्के
वाडीवऱ्हे : ३३.४ टक्के
आंगणगाव : ३८.७ टक्के
टाकेद : ३९.३ टक्के
धारगाव : ३९.३ टक्के
सौंदाणे : ४०.७ टक्के