धुळे : टुडे पान ३ साठी...
--
लाचप्रकरणी संशयितांना
तीन दिवसांची कोठडी
--
अवैध वाळूचे वाहन सोडण्याचे प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ९ : हायवा वाहनावरील दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन तलाठ्यांसह एका खासगी व्यक्तीला जिल्हा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. ८) सापळा रचून ही कारवाई केली होती.
साक्री रोडवरील मोती नाल्याजवळ तक्रारदाराचे हायवा वाहन रोखून अवैध वाळू वाहतुकीची कारवाई न करण्यासाठी धुळे शहर तहसील कार्यालयातील तलाठी दिनेश दिलवर दाभाडे (वय ४०, रा. मोहाडी, अतिरिक्त कार्यभार फागणे), तलाठी मृणाल शरद नगराळे (बाळापूर) आणि तलाठी गायकवाड याने वाहनचालकाचा मोबाईल काढून घेतला होता. तसेच २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने आधी आठ हजार रुपये दिले. मात्र उर्वरित १२ हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार केली. पडताळणीनंतर सापळा रचून संशयित खासगी व्यक्ती जयेश कैलास चौधरी (वय ३१) याच्यामार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी दाभाडे याला पकडण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार तलाठी नगराळे याला बुधवारी (ता. ९) सकाळी ताब्यात घेण्यात आले.