३६-४
मानाचा बैल हरवतोय; मिरवणुकीसाठी दुसऱ्याचा बैल
------------
यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या घटली; पोळ्याच्या परंपरेसमोर नवे प्रश्नचिन्ह
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१० : पोळा म्हटला की सजलेली बैलजोडी, ढोलताश्यांचा गजर आणि गावातून निघणारी मानाच्या बैलाची मिरवणूक... ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडणारे हे चित्र आजही अनेक गावांमध्ये पाहायला मिळते. मात्र, शेतीतील वाढते यांत्रिकीकरण आणि पिकांच्या पद्धतीत होत असलेल्या बदलांमुळे बैलांचे महत्त्व आणि संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी, ज्या शेतकऱ्यांना पोळ्याच्या दिवशी मानाच्या बैलाची मिरवणूक काढण्याचा मान मिळतो, त्यांनाच आता दुसऱ्याचा बैल आणण्याची वेळ येत आहे.
----------
पूर्वी शेतीची बहुतांश कामे बैलांच्या मदतीने केली जात असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात बैलजोडी असायची. त्यामुळे पोळ्याच्या दिवशी गावातील प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असायचे. बैलांना सजवून त्यांची पूजा केली जायची आणि मानाच्या बैलाची मिरवणूक हा गावाच्या सामूहिक आनंदाचा भाग असायचा. मात्र, ट्रॅक्टर, विविध कृषी यंत्रे आणि आधुनिक शेतीपद्धतींचा वाढता वापर यामुळे बैलांवर अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यातच बैलांचा सांभाळ, चारा आणि देखभालीचा वाढता खर्च यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बैलजोडी ठेवणे बंद केले आहे.
त्याचा परिणाम आता पोळ्याच्या परंपरेवरही जाणवू लागला आहे. काही गावांमध्ये मानाच्या बैलाची मिरवणूक काढण्याचा मान मिळाल्यानंतरही संबंधित शेतकऱ्याकडे बैल नसल्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडून बैल आणावा लागत आहे. मानाची परंपरा कायम असली, तरी त्या परंपरेचे प्रतीक असलेला बैल मात्र दुर्मीळ होत चालला आहे.
---
ओळख जपण्याचे आव्हान
ग्रामीण भागातील शेतीच्या बदलत्या स्वरूपामुळे बैलांची संख्या कमी होत असली, तरी पोळ्याशी जोडलेल्या परंपरा आणि भावनिक नाते आजही कायम आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या युगातही ‘मानाचा बैल’ ही ग्रामीण संस्कृतीची ओळख जपण्याचे आव्हान उभे राहिले आहे.