भाजप जिल्हाध्यक्षांच्या पुतण्यावर हल्ला
----
धुळ्यात गावठी कट्टा, सुऱ्याने वार करत सोनसाखळी लंपास
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ९ ः वाहन नीट चालविण्याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचे पुतणे, तसेच भाजपच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका कल्याणी अंपळकर यांच्या मुलावर गावठी कट्टा, सुरा आणि चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (ता. ७) सप्टेंबरला रात्री आझादनगर परिसरात घडली. हल्लेखोरांनी तरुणावर वार करून त्याच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वजनाची सोन्याची साखळीही हिसकावून नेली.
या प्रकरणी सुहास सतीश अंपळकर (वय २७, रा. मारोतीनगर, चाळीसगाव चौफुली, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. चाळीसगाव चौफुली येथील साखला पान सेंटर, तसेच जुना आग्रा रोडवरील मनोहर टॉकीजजवळील शिवशंभू दूध डेअरीसमोर हा प्रकार घडला. फिर्यादी सुहास अंपळकर यांनी संशयितांना वाहन नीट चालविण्याबाबत विचारणा केली होती. याच कारणावरून संशयितांनी त्यांना अडवून वाद घातला.
वाद विकोपाला गेल्यावर, उदय परदेशी याने दुचाकीच्या डिक्कीतून गावठी कट्टा काढून सुहास यांना धाक दाखविला. त्यानंतर तीक्ष्ण सुऱ्याने त्यांच्या छातीवर वार केला. सुहास यांनी पोटावर होणारा दुसरा वार हाताने रोखल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली, तर बेंबीजवळ सुरा खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, कुणाल परदेशी यानेही चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, झटापटीत सुहास यांनी वार हुकविला. इतर संशयितांनी त्यांना घेरून शिवीगाळ, दमदाटी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जय परदेशी याने सुहास यांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळ्याची सोन्याची साखळी तोडून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
आरडाओरड ऐकून सुहास यांचे मित्र भय्या जाधव, नरेश शंकर हिरे, सागर गणेश परदेशी यांच्यासह परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले. जमाव झाल्याचे पाहून संशयित दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या सुहास अंपळकर यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जबाब देण्यास विलंब झाल्याने संशयित उदय परशुराम परदेशी, कुणाल परशुराम परदेशी, कुणाल रवींद्र ऊर्फ बाळू घाटोळे, जय युवराज परदेशी (सर्व रा. पवननगर, धुळे), तसेच त्यांच्या इतर अन्य साथीदारांवर उशिराने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.