फोटो क्रमांक ः 29259
धुळे : संतोषीमाता चौकात रास्ता रोको आंदोलन करणारे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते.
---
धुळ्यात मराठा समाजाचा ठिय्या;
रास्ता रोकोने उडाली तारांबळ
--
‘त्या’ वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ९ ः मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे-पाटील यांच्याशी यापुढे चर्चा केली जाणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे बुधवारी (ता. ९) शहरातील संतोषीमाता चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे चौकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. चारही प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर वेळोवेळी केवळ आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल केली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप संतप्त आंदोलकांनी केला. मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करून राज्यव्यापी ‘चक्काजाम’ केला जाईल, असा इशाराही सरकारला देण्यात आला. वाहतूक विस्कळित होऊन तीव्र कोंडी झाल्याने स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनाला आक्रमक रूप आल्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळाने येथील वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.
आंदोलनात सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे, विनोद जगताप, भय्या शिंदे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, आबा कदम, राजेंद्र काळे, हेमंत भडक, उल्हास यादव, रणजित भोसले, गोविंद वाघ, विजय मराठे, संतोष लकडे, श्रीरंग जाधव, उल्हास पाटील, बबलू बागूल, वामन मोहिते, वीरेंद्र मोरे, जितू इखे, संदीप सूर्यवंशी, जीतू घोरपडे, अॅड. दिनेश काळे, विक्रम काळे, बाळासाहेब ठोंबरे, मनोज ढवळे, जगन ताकटे, प्रफुल्ल माने, वसंत हरळ, वैभव पाटील, नैनेश साळुंखे, अमर फरताडे, संदीप चव्हाण, राकेश भोसले, सुरेश पवार, सुनील वर्षे, भानुदास चौधरी, प्रभाकर वाघ, सोबत काळे, शरद मराठे, सुनील बर्गे, श्याम रायगुडे आदी सहभागी झाले होते.