मालेगाव वर्धापनदिन टुडे पुरवणी पान २ साठी लेख
-------------------
फोटो ः स्टेडियमचा येणार आहे.
--------------
बेस्ट स्कूलचा सुवर्णमहोत्सवी ज्ञानप्रवास
---------------
सटाण्यात अवघ्या २२ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक रोपट्याचा आज १७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा भक्कम वटवृक्ष झाला आहे. पाच दशकांच्या या प्रवासात शिक्षणासोबत संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास आणि क्रीडा क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या या संस्थेने आता सीबीएसई अभ्यासक्रम आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून नव्या पर्वात प्रवेश केला आहे.
- अंबादास देवरे, सटाणा
----------------
सटाणा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पाच दशकांपूर्वी बागलाण एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला. डॉ. मोहन माजगावकर, डॉ. पाटणकर, सुमतिलाल बुरड, भालचंद्र बागड यांच्यासह दूरदृष्टी असलेल्या नागरिकांच्या प्रयत्नांतून १९७६ मध्ये शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. मर्यादित साधनसामग्रीत सुरू झालेल्या या छोट्याशा शैक्षणिक रोपट्याने आज हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वासाची दिशा दिली आहे.
शाळेच्या वाटचालीत केवळ पुस्तकी शिक्षणाला महत्त्व न देता संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीवर भर देण्यात आला. काळानुरूप बदल स्वीकारताना सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, विविध शैक्षणिक प्रकल्प, मार्गदर्शन सत्रे आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्गखोलीच्या पलीकडील अनुभवाधारित शिक्षण देण्यात आले.
१६-१
क्रीडा क्षेत्रातही वेगळी ओळख
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातही मोठ्या संधी मिळाव्यात, यासाठी शाळेने विशेष प्रयत्न केले. सायकलिंग, बॉक्सिंग, हॉकी यांसह विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. आता शाळेच्या परिसरात भव्य स्टेडियम आणि २०० मीटरचा अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आला आहे. विनाअनुदानित शाळांमध्ये सिंथेटिक ट्रॅकची सुविधा असलेल्या मोजक्या शाळांमध्ये बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूलचा समावेश होतो.
१६-२
सीबीएसई नव्या पर्वाला सुरुवात
दहावीच्या परीक्षांमध्ये सातत्यपूर्ण निकालाची परंपरा निर्माण केल्यानंतर शाळेने सीबीएसई अभ्यासक्रमाची कास धरली आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात मिळालेली ‘सीबीएसई’ची मान्यता हा संस्थेच्या पन्नास वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यामुळे ग्रामीण तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक संधी आता परिसरातच मिळणार आहेत.
१६-१
विश्वासातून विस्तारलेला वटवृक्ष
२२ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली वाटचाल १७०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे हा केवळ आकडा नाही; तो पालकांच्या विश्वासाचा, शिक्षकांच्या समर्पणाचा आणि संस्थेच्या दूरदृष्टीचा प्रवास आहे. पन्नास वर्षांचा अनुभव, सीबीएसईचे नवे पर्व आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या बळावर बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूलने पुढील पिढीला ज्ञान, संस्कार, आत्मविश्वास आणि व्यापक संधी देण्यासाठी नव्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
-------------