इगतपुरीतील पाच तलाठ्यांवर कारवाई
---
प्रांताधिकाऱ्यांचे आदेश : मंडलाधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखली
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : गावनिहाय महसूल फेरफार नोंदी हातळणीतील अनियमिततेचा ठपका ठेवत इगतपुरी तालुक्यातील मंडलाधिकारी व पाच ग्राममहसूल अधिकाऱ्यांवर (तलाठी) कारवाईचा बडगा उगारण्यात आला. इगतपुरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी संबंधितांवर कारवाई करताना निलंबन व एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली.
इगतपुरी तालुक्यातील तलाठी, तसेच मंडलाधिकाऱ्यांची दफ्तर तपासणी करण्यात आली. प्रांताधिकारी दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या तपासणी मोहिमेत मौजे मुकेणे, वाडीवऱ्हे, मुंढेगाव, सांजेगाव, तसेच गोंदेदुमाला या गावांमधील तलाठ्यांच्या कामात अनियमितता आढळून आली. त्यात फेरफार नोंदीवेळी नोटीस न बजावता कार्यवाही पूर्ण करणे, अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन फेरफार नोंदी घेणे, कागदपत्रांची तपासणी न करता तसेच खातेदारांना हितसंबंधित नोटीस न बजावता फेरफार नोंदींची कार्यवाही पूर्ण करून घेण्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
वाडीवऱ्हेचे मंडलाधिकारी बबन कोकाटे यांच्या दफ्तर तपासणीत अधिनस्त तलाठ्यांच्या कामकाजावर नियंत्रण नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, ई-ऑफिसद्वारे नामंजूर केलेल्या फेरफार नोंदीमध्ये संबंधित तलाठ्यांकडून कागदपत्रांच्या पूर्ततेत कसूर केल्याचा ठपका ठेवत कोकाटे यांच्यावर प्रांत दत्ता यांनी कारवाई केली आहे. प्रांताधिकाऱ्यांनी उगारलेल्या कारवाईत तीन तलाठ्यांचे निलंबन करताना त्यातील एकाच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. उर्वरित दोन तलाठी व मंडलाधिकाऱ्याची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले. अवघ्या तालुक्यात या कारवाईची चर्चा रंगली आहे.
कारवाई झालेले अधिकारी
मंडलाधिकारी : बबन कोकाटे (वाडीवऱ्हे)
तलाठी : नितीन केदार (वाडीवऱ्हे), सोमनाथ सांगळे (गोंदे दुमाला), समीक्षा देव (सांजेगाव), मनोज वाकदकर (मुंढेगाव), पुष्कराज निकम (मौजे मुकणे).
...तर कारवाई करा : डॉ. गेडाम
राज्य सरकारच्या आदेशानुसार नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या महसुली कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, आजही बहुतांश तलाठी, मंडलाधिकारी, तसेच इतर अधिकारी या आदेशाची अंमलबजावणी करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत.