29283
नाशिक : अपघातग्रस्त कार व दुचाकी.
भरधाव कारने दुचाकी, रिक्षाला उडवले
जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरचा कारनामा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० :जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच गुरुवारी (ता. १०) दुपारी भरधाव जात असलेल्या कारचालकाने दुचाकी आणि रिक्षाला धडक देत उडवले. या अपघातामध्ये तीन पादचारीही जखमी झाले आहेत. संशयित कारचालक मद्याच्या नशेत होता. त्याच्याकडील ओळखपत्रावरून तो जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. डॉ. दिनेश सीताराम पवार असे संशयित चालकाचे नाव आहे.
डॉ. पवार कारने (एमएच १५ जेएम ४५२५) मेहेर सिग्नलकडून जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने समोरील दुचाकी आणि रिक्षाला (एमएच १५ जेए ८२९७) पाठीमागून जोरदार धडक देत उडविले. त्यानंतर पायी जाणाऱ्यांना तिघांना धडक दिली. अपघातानंतर जमावाने गर्दी करीत कारला घेरले. कारचालक डॉ पवार यांना बाहेर ओढून काढले असता, ते मद्याच्या नशेत धुंद होते. नागरिकांनी त्यांच्या खिशातील ओळखपत्र काढले असता, त्यांची ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अपघातातील जखमींसह कारचालक डॉ. पवार यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.