गंगापूर रोडवर सव्वातीन लाखांचे ‘एमडी’ जप्त
गंगापूर पोलिसांची कारवाई : तिघांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : शहरात अमली पदार्थांची बेकायदा विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, गंगापूर परिसरातील गोवर्धन ते कानेटकर गार्डन रस्त्यावर छापा टाकून तब्बल तीन लाख ३५ हजार ८८० रुपयांचा ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक केली आहे.
अनिकेत बाळू गांगुर्डे (वय २५, रा. राजवाडा, गंगापूर गाव), सागर काशीनाथ गांगुर्डे (३२, रा. सावन रो-हाउस, शिवाजीनगर, कार्बन नाका), राहुल खंडारे (२६, रा. ध्रुवनगर, नाशिक) अशी तिघा संशयितांची नावे आहेत.
गंगापूर पोलिसांनी बुधवारी (ता. ९) रात्री ही कारवाई केली. गोवर्धनकडून कानेटकर गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीटलाइटसमोर काही तरुण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. या कारवाईदरम्यान मोपेडवर (एमएच १५, जीएम ०२७७) आलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता अनिकेत बाळू गांगुर्डे याच्याकडून दोन लाख २७ हजार ५८० रुपये किमतीचे ७५.८६० ग्रॅम ‘एमडी’ आणि सागर काशीनाथ गांगुर्डे याच्याकडून ६८ हजार १०० रुपये किमतीचे २२.७०० ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. तसेच संशयितांकडून दोन महागडे स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि मोपेड असा एकूण तीन लाख ३५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खंडारेकडून आणले ड्रग्ज
संशयितांची अधिक चौकशी केली असता, हा एमडी ड्रग्जचा साठा त्यांनी विक्रीसाठी राहुल खंडारे (२६, रा. ध्रुवनगर, नाशिक) याच्याकडून आणल्याची कबुली पंचांसमक्ष दिली. या प्रकरणी पोलिस शिपाई प्रशांत देशमुख (२८, रा. म्हसरूळ) यांनी फिर्यादीवरून संशयित तिघांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक श्रीराम पाटील तपास करीत आहेत.