धुळे : टुडे पान ३ साठी... अवतीभवती
--
संस्कृत दिनानिमित्त
भित्तिपत्रिका अनावरण
धुळे : धुळे एज्युकेशन सोसायटी संचलित किसनराव सोनुजी करनकाळ न्यू सिटी हायस्कूलमध्ये संस्कृत दिनाचे औचित्य साधून भित्तिपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. मुख्याध्यापक एन. व्ही. नागरे यांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचे अनावरण झाले. उपमुख्याध्यापक एस. पी. भामरे, पर्यवेक्षक डॉ. बागुल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या अनन्या श्रीवास्तव, आणि संस्कृत शिक्षिका सीमा डोंगरे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संस्कृत सुभाषिते, सुवचने, संख्या, व्याकरणाचे तक्ते व परोपकार या विषयांवर आकर्षक पोस्टर्स तयार केली होती. आठवी ''ब''च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कलाकृतींचे मान्यवरांनी कौतुक केले. अनन्या श्रीवास्तव यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व व भविष्यातील संधींवर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक नागरे यांनी दैनंदिन जीवनातील संस्कृतचा उपयोग व विविध संधींविषयी विचार मांडले. संस्कृत शिक्षिका सीमा डोंगरे व आठवी ''ब''च्या विद्यार्थ्यांनी संयोजन केले.
--
फोटो : 29298
शुभांगी मोरे यांना
पीएच.डी. पदवी
धुळे : अभयनगर येथील रहिवासी शुभांगी राहुल मोरे यांनी फार्मसी विषयात ‘मधुमेहाच्या उपचारासाठी सूक्ष्म-पायसावर आधारित मायक्रोनीडल्स’ या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे मोरे व सोनवणे परिवाराचा मान उंचावला आहे. पंचम दलपत मोरे व आशाबाई पंचम मोरे यांच्या सूनबाई आणि रत्नाकर एकनाथ सोनवणे व छायाबाई सोनवणे यांच्या त्या कन्या आहेत. माहेर व सासरच्या पाठबळामुळे हा संशोधनाचा आव्हानांनी भरलेला प्रवास यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. या यशात पती राहुल मोरे यांच्यासह कुटुंबीयांची साथ महत्त्वाची ठरली. त्यांच्या या यशामुळे फार्मसी व संशोधन क्षेत्रात युवा पिढीला प्रेरणा मिळेल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
--
श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे
पूजनासह दहीहंडी
धुळे : बधीर पुनर्वसन संस्थेच्या प्रा. रघुनाथ केले वाक श्रवण विकास विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यालयातील एका विद्यार्थिनीने दहीहंडी फोडत या आनंदसोहळ्यात विशेष रंंगत आणली. समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद धुळेचे माजी सहायक आयुक्त संजय सैदाणे आणि निरंजन भतवाल उपस्थित होते. मुख्याध्यापक यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विशेष शिक्षिका कोमल करडक यांच्याकडून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना काल्याचा प्रसाद वाटण्यात आला आणि गोपाळकाला उत्साहात साजरा झाला. विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
--
कृष्णा कुरेकरची
स्पर्धेसाठी निवड
धुळे : दोंडाईचा येथील रावल बॅडमिंटन अकॅडमीचा खेळाडू कृष्णा कुरेकर याची अयोध्या येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेत कृष्णाने नंदुरबार विभागाचे नेतृत्व केले. एरंडोल, जळगाव व धुळे विभागातील खेळाडूंवर मात करत त्याने ही कामगिरी केली. तो रावल बॅडमिंटन अकॅडमीत मुख्य प्रशिक्षक प्रशांत चौधरी (भामरे) यांच्या मार्गदर्शनात सराव करतो. कृष्णाच्या यशाबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल, उद्योगपती सरकारसाहेब रावल, जिल्हा सचिव डी. व्ही. पाटील, खेळाडू डॉ. निलेश पवार, नितीन खडसे, डॉ. गणेश खैरनार, महेश सोनार, डॉ. अनिल धनगर, संजय सराफ, रमेश घोडके, संदीप सराफ, रोहित गिरासे, कृष्णा सोनार, हिमांशू चौधरी, अंकित जैन, शेखर सोनवणे, प्रवीण पाटील, संजय शर्मा, संदीप भदाणे, देव भदाणे, हर्षित चौधरी, रोहित कुकरेजा, भावेश तावडे, मोहक अग्रवाल, अवनीश भावसार, हितांशू निकवाडे तसेच मुख्य प्रशिक्षक प्रशांत भामरे यांनी कौतुक केले.