महापालिकेत आज
स्थायी समितीची सभा
पोषण आहार, रस्ते, गटारींवर होणार चर्चा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : जळगाव महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी (ता. ११) सकाळी अकराला महापालिका प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत विकासकामे, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय बाबींशी संबंधित आठ प्रस्तावांवर चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
सभेत प्रभाग क्रमांक ३ मधील जुना आसोदा रोड परिसरात आर.सी.सी. गटार व स्लॅब कल्व्हर्ट उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत हे काम करण्यात येणार असून, मक्तेदार डी. एच. पाटील कन्स्ट्रक्शन यांनी सादर केलेल्या निविदा दरास मान्यता देण्याचा विषय समितीसमोर ठेवण्यात आला आहे. मनपा संचालित बालवाड्यांमधील बालकांसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पोषण आहार उपलब्ध करून देण्यासाठी ई-निविदा काढण्यासही समितीची मंजुरी घेतली जाणार आहे. प्रती बालक आठ रुपये दराने हा आहार पुरविण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय मनपाच्या इमारती व पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याच्या यापूर्वी मंजूर प्रस्तावाची वैधानिकता तपासून त्याच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा होणार आहे. या विषयांसह अन्य प्रस्तावांवर समिती निर्णय घेणार आहे.