धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H29306
धुळे : मांस विक्रेत्यांना नोटीस बजावतांना मनपा कर्मचारी.
---
महापालिका क्षेत्रात उघड्यावर मांस विक्री बंद
---
महापालिका प्रशासन; १५ दिवसात परवाना घेणे बंधनकारक; नियमभंग केल्यास कारवाई
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : महापालिका क्षेत्रातील चिकन, मटन व मासे विक्रेत्यांनी व्यवसायासाठी महापालिकेचा अधिकृत परवाना घेणे बंधनकारक आहे. परवान्याशिवाय व्यवसाय तसेच उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. यासंदर्भात मांस विक्रेत्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली दहा चिकन विक्रेते, १४ मटन विक्रेते व मासे विक्रेते अशा एकूण ४८ विक्रेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मांस विक्रेत्यांना नोटीसा मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्काची पूर्तता करून १५ दिवसाच्या आत विक्री परवाना प्राप्त करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्राप्त झालेला परवाना दुकानाच्या दर्शनी भागात लावणे. तसेच, त्याचे वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक राहील. परवाना प्राप्त करुन घेण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करावा, याबाबतची माहिती मनपा सोशल मिडीया फेसबुक, इन्स्टाग्राम यावर प्रसारीत करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मालमत्ता व्यवस्थापन अधीक्षक मनिष शेंद्रे यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
उघड्यावर मनाई
मांस, चिकन व मासे यांची विक्री करताना स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. विक्रीसाठी ठेवण्यात येणारे मांस दुकानाच्या आत बंदिस्त व स्वच्छ ठिकाणी ठेवावे. दुकानाबाहेर उघड्यावर मांस ठेवणे अथवा ते नागरिकांना उघडपणे दिसेल अशा पद्धतीने मांडणे पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. दुकानात डस्टबीन ठेवून निर्माण होणारा कचरा दररोज महापालिकेच्या घंटागाडीमध्येच द्यावा. दुकानाबाहेरील रस्ता, फूटपाथ अथवा सार्वजनिक जागेवर व्यवसायाशी संबंधित साहित्य ठेवून अतिक्रमण करता येणार नाही.
अन्यथा कारवाई
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार विनापरवाना मांस विक्री, अस्वच्छ किंवा आरोग्यास अपायकारक मांस विक्री तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा व्यवसाय सिलबंद करण्यात येवून मानवी आरोग्यास हानी पोहोचू नये, यासाठी परिस्थितीनुसार माल जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्याची तसेच कायद्यानुसार पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.
---