आदिवासींचे ठरले ! नाशिकहून २८ तारखेला ’लाँग मार्च’

आदिवासींचे ठरले ! नाशिकहून २८ तारखेला ’लाँग मार्च’
Published on
आदिवासींचे ठरले! नाशिकहून २८ ला ‘लाँग मार्च’ मुंबईत ५ ऑक्टोबरला धडकणार; राज्यातील पाच हजार युवक सहभागी होण्याचा अंदाज सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : आदिवासी वसतिगृहातील असुविधांविरोधात गेल्या महिन्याभरापासून धरणे आंदोलन करणारे युवक २८ सप्टेंबरला नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढणार आहेत. राज्यातील पाच हजार समाजबांधव या मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज असून, ५ ऑक्टोबरच्या दरम्यान हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून मंत्री प्रा. अशोक उईके यांनी राजीनामा देण्याची मागणी युवकांनी केली आहे. त्यासाठी महिन्यापासून युवकांचे धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मंत्री उईके यांनी या आंदोलकांची प्रत्यक्ष भेट घेतली. चर्चेसाठी मुंबईतही बोलविले. पण आंदोलक त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी नाशिक ते मुंबई पायी जाण्याचा निर्धार केला असून, अनंत चतुर्दशीनंतर म्हणजेच २८ तारखेला नाशिकहून मुंबईकडे निघतील. दररोज किमान २५ ते ३० किलोमीटर पायी चालण्याचे नियोजन आहे. मुंबईत पोहोचण्यासाठी त्यांना सहा ते सात दिवस लागतील. मुक्कामाच्या ठिकाणी जेवण व निवासव्यवस्था कशी करायची, याचे सध्या नियोजन सुरू आहे. गणेशोत्सव काळातच हा लाँग मार्च काढण्याचे नियोजन होते. मात्र, पोलिसांची परवानगी मिळण्याची अडचण आणि लाँग मार्चमुळे नागरिकांच्या उत्सवावर विरजण नको, म्हणून आंदोलकांनी गणेशविसर्जनानंतर हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या कान्याकोपऱ्यातून समाजबांधव, युवक-युवती यात सहभागी होतील, त्यामुळे सद्यःस्थितीला मोर्चेकऱ्यांचा अचूक अंदाज बांधणे कठीण असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. मात्र, पाच हजारांपर्यंत हा आकडा पोहोचेल आणि रस्त्याने पुढे जात असताना अधिकाधिक समाजबांधव जोडले जातील, असा अंदाज आहे. मंडपाचे भाडे पावणेदोन लाख साधारणत: महिन्याभरापासून शहरातील ईदगाह मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनासाठी उभारलेल्या छोटेखानी मंडपाचे भाडे आता पावणेदोन लाखांवर पोहोचले आहे. मंडपवाल्याने भाड्याची मागणी केल्यानंतर आता या युवकांनी पैशांची जुळवाजुळव सुरू केली असून, अनामत स्वरूपातील २० हजार रुपयांची पहिल्या आठवड्यातच पूर्तता झाली. कोट मुंबईत किती आंदोलक पोहोचतील, तेथील आंदोलनाच्या नियोजनाबाबत अद्याप अंतिम निर्णय व्हायचा आहे. मात्र, नाशिकमधून २८ तारखेला मुंबईकडे लाँग मार्च निघेल. यात किती समाजबांधव सहभागी होतात, हे सांगणे सध्या अवघड आहे. -प्रशांत गावंडे, आंदोलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com