पान-१ मेन
फोटो : 29313
नंदुरबार : शिवसेनेच्या मेळाव्यात गुरुवारी बोलताना गुलाबराव पाटील. शेजारी उदय सामंत, चंद्रकांत रघुवंशी, शिरीष चौधरी, रत्ना रघुवंशी, ॲड. राम रघुवंशी आदी.
कार्यकर्त्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही
उदय सामंत, गुलाबराव पाटलांचा शिवसेना मेळाव्यात इशारा
------------------------------
नंदुरबार, ता. १० : जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कार्यकर्त्यांच्या जिवावर वाढत आहे. अशावेळी मित्रपक्ष कार्यकर्त्यांवर अन्याय करणार असेल, तर ते कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी (ता. १०) दिला. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या म्हणीप्रमाणे त्यांनी शिवसेनेवर टीका करत राहावी. यात आमचाच फायदा आहे, असा टोलाही त्यांनी या वेळी मित्रपक्षांना लगावला. श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात शिवसेनेचा संघटनात्मक मेळाव्यात ते बोलत होते.
..........
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची बाब उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी दोन्ही मंत्र्यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीला थेट इशारा दिला. माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, की जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी काळजी करू नये. त्यांच्या अडीअडचणींची आम्हाला जाणीव असल्याने त्यांच्यावर अन्याय होऊ होणार नाही. जिल्ह्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमदार रघुवंशी पक्ष वाढवत आहेत. १५ खासदार आणि ७६ आमदारांचा आमचा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला कोणी कमी समजू नये.
गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात निधी वितरणाबाबत प्रश्न उपस्थित केला. मीही जळगावचा पालकमंत्री असून, त्याठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींना निधी देत असतो. त्यामुळे इथल्या पालकमंत्र्यांनाही आमच्या पक्षाच्या आमदारांना निधी द्यावाच लागेल. नंदुरबारचे पालकमंत्री समन्वय समितीत आहेत, याची त्यांनी जाणीव ठेवावी. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्ह्यात विविध योजना हाती घेण्याची मागणी केली.
शिवसेनेचे नेते विजय पराडके यांना पक्ष भविष्यात हमखास न्याय देईल, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीप्रसंगी नेतृत्वाने दिले आहे. त्यामुळे पराडके यांना महामंडळाचे अध्यक्षपद देऊन न्याय द्यावा, अशी मागणी आमदार रघुवंशी यांनी दिली.
प्रा. डॉ. माधव कदम यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, माजी सभापती गणेश पराडके, महिला आघाडीप्रमुख ज्योती राजपूत, परवेज खान, देवमन पवार, डॉ. सयाजी मोरे, मनलेश जयस्वाल आदी उपस्थित होते.
...........
चौकट ----
आमदार रघुवंशींच्या डोळ्यात अश्रू!
आमदार रघुवंशी यांनी निधी वितरणाबाबतीत अन्याय होत असल्याची भावना मांडली. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असूनही कार्यकर्त्यांना निधीअभावी न्याय देता येत नाही. त्यामुळे त्यांना न्याय द्यायचा कसा, असा सवाल करीत आमदार रघुवंशींच्या डोळ्यात अश्रू आले. यावर आम्ही दोन्ही मंत्री नंदुरबार जिल्ह्याकडे विशेष लक्ष पुरवू. यापुढे कोणत्याही शिवसैनिकाच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, याची काळजी घेऊ, असे आश्वासन मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील यांनी दिले.
---------