धुळे : टुडे पान १ साठी...
--
फोटो क्रमांक : 29317 व 29318
धुळे : गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीच्या बैठकीत भूमिका मांडताना ॲड. प्रसाद देशमुख. समोर उपस्थित जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलिस अधीक्षक विशाल आनंद.
--
आवाजाच्या निर्धारित मर्यादेचे उल्लंघन करू नये
-
जिल्हाधिकारी : गणेशोत्सवात प्रेशर मिड, प्लाझ्मा, हॉर्न साऊंड सिस्टीमला मनाई
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : शहरासह जिल्ह्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव भक्तिमय, शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करावा. तसेच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले. या उत्सवात प्रेशर मिड, प्लाझ्मा आणि हॉर्न साऊंड सिस्टीम वापरण्यास सक्त मनाई असून, आवाजाच्या निर्धारित मर्यादेचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीकांत तळेगावकर, मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
-
तर मंडळांवर कारवाई...
जिल्हाधिकारी विसपुते म्हणाल्या, की गणेश मंडळांनी प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे. मंडपात तसेच मिरवणुकीत केवळ गणपतीची आणि भक्तीचीच गीते लावण्यास प्राधान्य द्यावे. सामाजिक वातावरण बिघडवणारी किंवा उत्सवाच्या पावित्र्याला बाधा पोहोचवणारी गिते लावू नयेत. रस्त्यावर धिंगाणा घालू नये. मंडळांनी समाजप्रबोधन, बांधिलकी, सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन आणि नागरिकांचा सहभाग वाढविणाऱ्या विधायक उपक्रमांवर भर द्यावा. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिल्यास संबंधित मंडळावर कारवाई केली जाईल. नियम प्रत्यक्षात पाळले जात आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपण स्वतः भेटीसत्र राबविणार आहोत.
-
पदाधिकाऱ्यांच्या सूचना
माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी नगरसेवक अनिल मुंदडा, ॲड. प्रसाद देशमुख, डॉ. अभिनय दरवडे, डॉ. संजय शिंदे, उमेश चौधरी, धनंजय दीक्षित, नवल ठाकरे यांच्यासह डीजे असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या. यात मंडळांना पुरेसे होमगार्ड मिळणे, मद्यपींवर कारवाई करणे, विसर्जनस्थळी पीओपी विरघळणारी पावडर उपलब्ध करून देणे, वीजपुरवठा व पथदिवे सुरळीत ठेवणे, खड्डे दुरूस्ती व गटारींची तत्काळ स्वच्छता करणे आणि सर्व सण-उत्सवांवर समान नियम व निर्बंध लागू करणे यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने सर्व सूचनांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन सर्वांच्या सहकार्याने उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
-
ध्वनीमर्यादांचे पालन करा
पोलिस अधीक्षक आनंद म्हणाले, की गणेशोत्सव आनंदात आणि जल्लोषात साजरा करा. ध्वनिप्रदूषण रोखणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. अतितीव्र आवाजाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गणेशमूर्तीच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत मिरवणुका, मंडप तसेच कार्यक्रमांमध्ये निर्धारित ध्वनीमर्यादांचे पालन करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ध्वनीमर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल आणि हे नियम सर्वधर्मीयांच्या सण-उत्सवांना समान लागू राहतील.
-
१४-१
...चौकट...
१४-१
डॉल्बी सिस्टिम, लेझर लाईटला बंदी
पोलिस अधीक्षकांकडून गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवात आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टिमच्या अतिवापरामुळे काही नागरिकांना कान व छातीचा त्रास होऊन आरोग्यविषयक गंभीर परिणाम झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली. तसेच लेझर लाईटच्या किरणांमुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांना इजा झाल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे या कालावधीत शहरासह जिल्ह्यात सागणेशोत्सव व नवरात्रोत्सव या कालावधीत सर्व मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टिम व लेझर लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नियमांचा भंग झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षकांनी नमूद केले.