धुळे ः टुडे १ संक्षीप्त
--
आरोग्य शिबिरे
आजपासून सुरू
धुळे : शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त एबी फाउंडेशनतर्फे गरीब व गरजू रुग्णांसाठी सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. यात गुजरात, नाशिक, जळगाव, धुळे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिरे होतील. शिबिरांचे वेळापत्रक : ११ सप्टेंबर- सकाळी ९ ते सायंकाळी ५, खुबा, गुडघा, लिगामेंट तपासणी व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिर, ठिकाण- साई स्पर्श हॉस्पिटल, शिव कुटियासमोर, ८० फूट रोड, धुळे, १२ सप्टेंबर- सकाळी ९ ते दुपारी ३, कॅन्सर व हृदयविकार शिबिर, ठिकाण : शतायू हॉस्पिटल, व्हेरिकोज व्हेन्स शिबिर, १७ सप्टेंबर- सकाळपासून, नाशिक, जळगाव, धुळे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने आरोग्य शिबिर, ठिकाण- पाण्याच्या टाकीजवळ, फॉरेस्ट कॉलनी, देवपूर (नगरसेवक ललित माळी यांच्या सहकार्याने). लाखोंचा खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया या शिबिरांमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध होणार असल्याने आर्थिक दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एबी फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश देवरे यांनी केले.
-
विष प्राशनाने
तरुणाचा मृत्यू
धुळे : निमखेडी (ता. धुळे) येथे तापीराम बनगर दळवी (वय ३०) याने घरी विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
शेतातील विहिरीत
एक मृतावस्थेत
धुळे : इंदवे (ता. साक्री) शिवारातील शेतातील विहिरीत एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांनी त्याला विहिरीतून बाहेर काढून जैताणे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृताची ओळख करण युवराज धार अशी पटली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-
गळफास घेतल्याने
एकाचा मृत्यू
धुळे : शहरातील मनीष बापूराव साळुंखे (वय ४०, रा. शिवशक्ती कॉलनी, चितोड रोड परिसर) यांनी घराच्या वरच्या मजल्यावरील लोखंडी कडीला दोराच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना सात सप्टेंबरला उघडकीस आली. त्यांना जिल्हा रूग्णालय येथे दाखल केले; मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
-