‘केसीई’च्या अभियांत्रिकीत
‘इंडक्शन प्रोग्रॅम’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१२ : येथील खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (स्वायत्त) महाविद्यालयात प्रथम वर्षातील अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’ संकल्पनेवर आधारित इंडक्शन प्रोग्रॅम २०२६ नुकताच उत्साहात पार पडला.
नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख करून देतानाच व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव, सर्जनशीलता, नवोन्मेषी विचार व संवादकौशल्य विकसित करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमाचे उद् घाटन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, सह्याद्री बिरले, शिवानी, केसीई सोसायटीचे सचिव ॲड. प्रकाश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सह्याद्री बिरले यांनी ‘युवा सक्षमीकरण व व्यसनमुक्त जळगाव’ या विषयावर मार्गदर्शन केले. व्यसनमुक्त समाजासाठी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सह्याद्री बिरले यांनी केले. त्यानंतर विद्यार्थी व प्राध्यापकांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. दुसऱ्या दिवशी डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी सकारात्मक विचार, आत्मविश्वास व आव्हानांना सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन केले. ‘आपण फाउंडेशन’च्या संस्थापक ॲड. देवयानी गोविंदवार यांनी विविध मॅनेजमेंट गेम्सच्या माध्यमातून नेतृत्वगुण, टीमवर्क, निर्णयक्षमता आणि संवादकौशल्य विकसित करणारे उपक्रम घेतले. तिसऱ्या दिवशी डॉ. नवीन खंडारे यांनी ‘नावीन्यपूर्णता व जनरेशन झेडमधील बदल’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मीनाक्षी सोनी यांनी विविध प्रात्यक्षिक व सहभागात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव दिला. चौथ्या दिवशी आर. जे. अमोल देशमुख यांनी ‘रेडिओ मनभावन’च्या प्रवासाची माहिती देत माध्यम क्षेत्रातील संधी व सामाजिक योगदान याबाबत मार्गदर्शन केले. अँटी-रॅगिंगविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. व्याख्याने, प्रात्यक्षिके, विविध उपक्रम व सांस्कृतिक सादरीकरणामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. प्रथम वर्षातील विद्यार्थी व पालकांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.