सरपंच महासंघ सर्वोच्च न्यायालयात जाणार
---
दोनपेक्षा अधिक अपत्यांच्या निवडणूक अपात्रता प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणाऱ्या तरतुदीविरोधात दाखल असलेल्या याचिकेचा निकाल तातडीने लावावा, अशी आर्जव घेऊन सरपंच महासंघ सर्वोच्च न्यायालयात त्रयस्थ अर्जदार म्हणून सहभागी होणार आहे. आधीच सुनावणी पूर्ण झालेल्या या प्रकरणात हस्तक्षेप करून निर्णय लवकर देण्याची मागणी करण्यात येणार असल्याची भूमिका सरपंच महासंघाचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १४ (१) (जे-१) नुसार दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. या तरतुदीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी ‘मंगला भीमराव इंगळे विरुद्ध महाराष्ट्र शासन’ ही विशेष अनुमती याचिका (एसएलपी क्रमांक ३०७७२/२०२५) सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, आता न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे. दुसरीकडे राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रश्नाचा निर्णय निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी होणे आवश्यक असल्याचे सरपंच महासंघाचे म्हणणे आहे.
राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून दोनपेक्षा अधिक अपत्यांच्या आधारावर निवडणूक लढविण्यावरील निर्बंधांमध्ये बदल केल्याचा दाखला देत महाराष्ट्रातील तरतुदीचाही पुनर्विचार व्हावा, अशी भूमिका ग्रामगौरव फाउंडेशन कृत महाराष्ट्र ग्रामविकास परिषद सरपंच महासंघाची असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
चौकट
इच्छुकांनी सहअर्जदार व्हावे
दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याने क्षमता असतानाही निवडणूक लढविण्यास तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरण्याची भीती असणाऱ्या राज्यातील इच्छुकांना महासंघाच्या त्रयस्थ अर्जात सह-अर्जदार म्हणून सहभागी होता येणार असून, यासाठी विवेक ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा.