एम-सँड युनिटसाठी
जिल्ह्यात अर्ज मागविले
नाशिक, ता. ११ : राज्य सरकारच्या एम-सँड धोरणांतर्गत जिल्ह्यात कृत्रिम वाळू (एम-सँड) निर्मिती युनिट उभारणीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात एम-सँड धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणांतर्गत एम-सँड युनिट उभारणीसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया जिल्हा खनिकर्म विभागाने सुरू केली असून, इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. अर्जासोबत मिळकतीचा चालू सातबारा उतारा जोडणे आवश्यक आहे. वैयक्तिक अर्जदारांनी आधारकार्ड व पॅनकार्ड, तर संस्थांनी संस्थेशी संबंधित कागदपत्रे जोडावीत. याशिवाय ५०० रुपये अर्ज शुल्क तसेच युनिट उभारावयाच्या ठिकाणचे पर्यावरणीय व इतर आवश्यक परवानगी प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. एम-सँड उत्पादनासाठी दगड कोणत्या खाणपट्ट्यातून किंवा इतर स्रोतांतून आणला जाणार आहे, त्याचा तपशील अर्जात नमूद करावा लागेल. संबंधित खाणपट्टा अथवा स्रोताबाबतचे उद्योग आधार प्रमाणपत्रही जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी एम-सँड उत्पादन करणाऱ्या युनिटधारकांनी ‘महाखनिज’ संगणक प्रणालीवर अर्ज केला असल्यास, त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.