तेजसमुळे चार रुग्णांना मिळाले नवजीवन
कुटुंबीयांनी जपले सामाजिक भान; हृदय मुंबईला, यकृत पुण्याला पाठविले
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तेजस गायकवाड या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना गायकवाड कुटुंबीयांनी दाखवलेल्या दातृत्वामुळे चार रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. तेजसच्या अवयवदानासाठी प्रशासनाने तातडीने रस्ता व हवाईमार्गे ग्रीन कॉरिडॉर तयार केला. हृदय विमानाने मुंबईत, तर यकृत आणि मूत्रपिंड पुण्यात तर नाशिकमध्ये त्वचा व नेत्र अवघ्या काही तासांत यशस्वीरीत्या पोहोचवले.
आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व मविप्र रुग्णालयात तेजसवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित केल्यानंतर अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (झेडटीसीसी) ची परवानगी घेतली. त्यांच्या समुपदेशनानंतर गायकवाड कुटुंबीयांनी सामाजिक भान जपत अवयवदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
---चौकट
ग्रीन कॉरिडॉर ठरली महत्त्वाची
नाशिक विमानतळ ते मुंबई विमानतळ असा विशेष एअर ग्रीन कॉरिडॉर तयार करून तेजसचे हृदय मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात पोहोचविले. एक मूत्रपिंड पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात, तर यकृत रुबी हॉल रुग्णालयाला पाठविले. याशिवाय, दोन्ही नेत्र मविप्र रुग्णालयातील नेत्रपेढीस आणि त्वचा नाशिक येथील डॉ. नेहते रुग्णालयातील त्वचापेढीत दान केली. एक मूत्रपिंड नाशिकमध्ये मविप्र रुग्णालयात दान करून यशस्वीरीत्या प्रत्यारोपण केले.
--- कोटः
तेजसचा अपघातात दुर्दैवाने मेंदू मृत झाला. मात्र, दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्याच्या आई-वडिलांनी आणि नातेवाइकांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय समाजोपयोगी, प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.
- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र.