ग्रामसमृद्धी नांद्रा लेख : सूर्यवंशी (पाटील) परिवार
---
(या बातमीचे फोटो वॉट्स ॲपवर टाकले आहे)
----
सात कामगारांपासून
६०० कुटुंबांच्या आधारापर्यंत
सूर्यवंशी (पाटील) परिवाराची यशोगाथा
लीड..
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर शून्यातून विश्व उभारण्याचे जिवंत उदाहरण म्हणजे नांद्रा येथील सूर्यवंशी (पाटील) परिवार. हॉटेल व्यवसायापासून सुरू झालेला प्रवास शेती, समाजसेवा, देशसेवा आणि उद्योगापर्यंत पोहोचला असून, राजेंद्र पाटील यांच्या उद्योगातून आज ६०० कुटुंबांना रोजगाराचा आधार मिळाला आहे. संघर्ष, त्याग आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा या परिवाराने जपली आहे.
-----
या परिवाराचे आद्य पुरुष कै. सुखदेव नामू पाटील. १९५६ ते १९७५ या काळात त्यांनी हॉटेल व्यवसायात आपला ठसा उमटवला. पहाण, आसनखेडे, कुरंगी, माहिजी या पंचक्रोशीत ते ‘सुकदेव लाला’ म्हणून प्रसिद्ध होते. याच व्यवसायातून प्रगती करून त्यांनी २७ बिघे शेती विकत घेतली.
-----
शेती आणि समाजसेवा
त्यांचे दुसरे चिरंजीव बळीराम सुखदेव पाटील यांनी शेती व्यवसाय सांभाळला. त्यांना पाच मुले व तीन मुली. १९८९ मध्ये कुटुंब समाजसेवेत सक्रिय झाले. नांद्रा ग्रामपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत अंजनाबाई बळीराम पाटील पहिल्या महिला उपसरपंच (१९८९-९५) झाल्या. त्यांनी गावात पहिले शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच महादेव मंदिरात पहिले महिला भजनी मंडळ स्थापन केले. थोरले चिरंजीव वसंत पाटील २००० ते २००४ पर्यंत उपसरपंच राहिले. त्यांचा थोरला मुलगा कैलास ‘बीएसएफ’मध्ये देशसेवा करत असताना २०२४ मध्ये शहीद झाला. दुसरा मुलगा अमोल (बंटी सर) जवखेडे येथे माध्यमिक शिक्षक, तर तिसरा नितीन सैन्यात दाखल आहे. त्यांच्या सूनबाई सोनम पाटील यांनी सरपंच म्हणून गावातील रस्ते व पाणीप्रश्न सोडविले.
शोकांतिकेतून संघर्षाकडे
विनायक पाटील यांचे २१ नोव्हेंबर १९९४ रोजी अपघाती निधन झाले. त्यावेळी पत्नी ललिता पाटील चार महिन्यांच्या गर्भवती होत्या. धाकटे बंधू राजेंद्र पाटील यांनी विधवा भावजाईशी विवाह करून आदर्श निर्माण केला. याच काळात त्यांना परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोगाची प्राप्ती झाली आणि जीवनाला एक नवी दिशा मिळाली.
शून्यातून ६०० कुटुंबांचे आधारवड
राजेंद्र बळीराम पाटील यांनी व्हीआयपी इंडस्ड्रीज, जळगाव येथील नोकरीनंतर २८ डिसेंबर २०१५ रोजी ‘राजकाल इंडस्ट्रियल सर्व्हिस, नाशिक’ सुरू केली. अवघ्या सात कामगारांपासून सुरू झालेला व्यवसाय आज ६०० कुटुंबांचा आधार बनला आहे. झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील ‘आयटीआय’मधून तरुणांना रोजगार देत महिंद्रा, हिंदाल्को, भारत वायर रोप आदी कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करून दिली. नांद्रा येथील आप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयास डिजिटल लायब्ररीसाठी कॉम्प्युटर सेट भेट दिला.
चौकट
नव्या पिढीची दमदार वाटचाल
राजेंद्र पाटील यांची मुले उच्चशिक्षित असून मुलाने ‘इ ॲण्ड टीसी’मध्ये इंजिनिअरिंग तर मुलीने एमबीए (एचआर) पूर्ण केले आहे. नुकतेच त्यांनी गावातील आपल्या एक हेक्टर शेतात ९४० केशर आंब्यांची लागवड केली असून कोणतेही रासायनिक खत न वापरता संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने ही बाग फुलवली जात आहे. समाजाला चैतन्ययुक्त फळ मिळावी आणि पुढील पिढी निरोगी राहावी, हा त्यामागचा हेतू आहे. धाकटे बंधू प्रमोद पाटील यांचे पुत्र शुभम यांनी ''शंभू मोबाईल'' व ''शिव सिरॅमिक'' तर अक्षय यांनी ''मोक्ष मेडिकल'' सुरू करून व्यवसायात पदार्पण केले आहे.