NSK26H29369
जळगाव : खंडित झालेल्या गणेशमूर्तीचे मेहरुण तलावात विसर्जन करताना कार्यकर्ते.
--
स्थापनेपूर्वीच गणेशमूर्तीचे विसर्जन
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटांची मूर्ती वाटेतच दुभंगली
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहात बऱ्हाणपूर येथून आणलेली १२ फूट उंचीची गणेशमूर्ती जळगावच्या वाटेवरच दुभंगल्याने नवी पेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना स्थापनेपूर्वीच मूर्तीचे विसर्जन करण्याची वेळ आली. सुमारे ४७ हजार रुपये खर्च करून तयार करून घेतलेल्या या मूर्तीची अवस्था पाहून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धक्का बसला. मूर्ती पूर्णपणे वाळण्यापूर्वीच ती घाईघाईने ताब्यात देण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप मंडळाने केला आहे.
जय महाराष्ट्र मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी बऱ्हाणपूर येथील मूर्तिकाराकडून १२ फूट उंचीची गणेशमूर्ती तयार करून घेतली होती. यासाठी मंडळाने सुमारे ४७ हजार रुपये दिले होते. मूर्ती जळगावकडे आणताना ती झाकून ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीदरम्यान मूर्तीला तडा गेल्याचे किंवा ती दुभंगल्याचे तत्काळ लक्षात आले नाही.
गुरुवारी सायंकाळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीवरील आवरण काढले. त्यावेळी मूर्ती दुभंगल्याचे निदर्शनास आले. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्थापनेसाठी तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी मूर्तीची अशी अवस्था झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि हळहळ व्यक्त झाली.
मेहरुण तलावात विसर्जन
दुभंगलेली मूर्ती मंडळाच्या मंडपात स्थापन करणे शक्य नसल्याने तिचे विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत दुभंगलेल्या गणेशमूर्तीचे मेहरुण तलावात विसर्जन करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करून मूर्तिकाराची निष्काळजी आढळल्यास योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मंडळाने केली आहे.
चौकट
मूर्तिकारावर निष्काळजीचा आरोप
मंडळाचे पदाधिकारी भूषण जोशी यांनी सांगितले, की मूर्तिकाराने पूर्ण पैसे घेतल्यानंतरही मूर्ती व्यवस्थित तयार करून दिली नाही. ओली मूर्ती घाईघाईने जळगावला पाठविल्याने वाहतुकीदरम्यान ती दुभंगली. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.