धुळे टुडे २ साठी...
---
नाट्यगृहाची तत्काळ दुरुस्ती करावी
सुरेश चत्रे ः कलाकारांना अल्प दरात नाट्यगृह उपलब्ध करावे
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ११ ः शहरातील महापालिकेचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. या नाट्यमंदिराची तातडीने दुरुस्ती करून ते स्थानिक कलाकारांना अल्प दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी धुळे जिल्हा कलावंत विकास मंचाचे अध्यक्ष सुरेश चत्रे यांनी केली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात अत्यंत अल्प दरात कलाकारांना आपली कला सादर करता यावी, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी सर्वसामान्य नागरिक, कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सांस्कृतिक कलाभवनांची निर्मिती केली. धुळे शहरातही राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहाची उभारण्यात आली. मात्र, अवाजवी आणि न परवडणाऱ्या भाड्यामुळे स्थानिक कलाकारांना या नाट्यगृहाचा काहीच उपयोग झालेला नाही. परिणामी, धुळ्यातील सांस्कृतिक चळवळीची मोठी अधोगती होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचे श्री. चत्रे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
नाट्यगृहाची दैना
सद्यःस्थितीत राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहाची अत्यंत बिकट अवस्था आहे. नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा (एसी), पंखे, ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व बंद अवस्थेत असून, प्रेक्षकांसाठीच्या खुर्च्या, तसेच प्रकाशव्यवस्था, पडदे पूर्णपणे खराब झाले आहेत. या ठिकाणी स्वतंत्र विजेची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्यामुळे आयोजकांना महागडे जनरेटर लावावे लागतात. तसेच पंखे व एसी बंद असल्याने बाहेरून कुलर भाड्याने आणावे लागतात. यामुळे कार्यक्रमांचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे.
मनपाने लक्ष घालावे
अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे प्रत्यक्ष मानवी संवाद कमालीचा कमी झाला आहे. त्यातून काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे धुळे महापालिकेने या गंभीर विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी तातडीने स्वतंत्र तज्ज्ञ पथकाची नेमणूक करावी व इतर जिल्ह्यांप्रमाणे परवडणाऱ्या दरात ते स्थानिक कलाकारांना उपलब्ध करावे अशी मागणी श्री. चत्रे यांनी केली आहे.