पान एकला सेकंड मेन)
--------------------
29392
नंदुरबार : शिबिराचे उद्घाटन करताना डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. विनय सोनवणे, डॉ. ज्ञानेश्वर निफटे, डॉ. नरेश पाडावी, मनोहर ढिवरे, करण वसावे, प्रीतेश खैरनार.
------------------------
नंदुरबारला ६५ बालकांवर होणार मोफत शस्रक्रिया
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आयोजन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १४ : राज्य शासनाच्या आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात बालकांची तपासणी व निदान अभियान राबविण्यात आले. यादरम्यान विविध जन्मजात विकृती, शारीरिक समस्या तसेच शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांचे निदान व उपचार सुनिश्चित करून विशेष संदर्भ सेवा शिबिर घेण्यात आले. यात ११६ बालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ६५ बालकांवर मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहेत. यासाठी त्यांना संदर्भित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निफटे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नरेश पाडावी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक मनोहर ढिवरे, कार्यक्रम सहायक करण वसावे, डीईआयसी व्यवस्थापक प्रीतेश खैरनार उपस्थित होते.
शिबिरामध्ये नाशिक येथील रेडियंट प्लस हॉस्पिटलच्या माध्यमातून ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य समस्यांची तपासणी व निदान करण्यात आले. आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तपासणीदरम्यान एकूण ११६ बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या १९ बालकांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले. तसेच डोळ्यांचा तिरळेपणा व मोतीबिंदू असलेल्या ४६ बालकांना पुढील शस्त्रक्रियेसाठी शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांच्या विविध आरोग्य योजनांच्या माध्यमातून आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी संदर्भित करण्यात आले. पात्र बालकांना आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही बालकाच्या उपचारात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. बालकांमध्ये आढळणारे गंभीर व गुंतागुंतीच्या आरोग्य समस्यांचे निदान करून आवश्यक उपचार व शस्त्रक्रियेसाठी संदर्भ सेवा दिली जात आहे.
- डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा रुग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू बालकांना मोठा आरोग्यलाभ मिळत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही बालकाला उपचारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा प्रभावीपणे उपयोग करण्यात येत आहे.
- डॉ. विनय सोनवणे, जिल्हा शल्य चिकीत्सक