धुळे ः टुडे १ साठी, अँकर
---
फोटो क्रमांक ः 29405....जयकुमार रावल
---
धुळे हे ‘गेटवे टू महाराष्ट्र’; औद्योगिक रोडमॅप तयार
पालकमंत्री जयकुमार रावल ः रावेर ‘एमआयडीसी‘ प्रस्तावाला मंजुरीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ११ ः येथील जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६ ही केवळ उद्योजकांची बैठक नसून, पुढील २५ ते ३० वर्षांचा धुळे जिल्ह्याचा औद्योगिक रोडमॅप निश्चित करणारी परिषद आहे. धुळे हे ‘गेटवे टू महाराष्ट्र’ असून, देशातील प्रमुख बाजारपेठांना जोडणारे हे भविष्यातील मोठे रेल्वे व लॉजिस्टिक हब बनेल, असा विश्वास राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. ११) आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पालकमंत्री रावल म्हणाले, की नाशिक, इंदूर, सुरत व अंकलेश्वर यांसारख्या शहरांपासून धुळे समदूर आहे. मुंबई-आग्रा, सुरत-नागपूर, धुळे-सोलापूर महामार्ग आणि मनमाड-इंदूर व धुळे-नरडाणा रेल्वे जोडणीमुळे जिल्ह्याचे लॉजिस्टिक महत्त्व वाढले आहे. तापी नदीमुळे मुबलक पाणी, शेतमाल अन् सौरऊर्जेची उपलब्धता आहे. अभियांत्रिकी, फार्मसी व वैद्यकीय संस्थांमुळे जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, ‘धुळे ही इंजिनिअर्सची खाण’ आहे. शिरपूर टेक्सटाइल हब, नरडाणा ग्रोथ सेंटर, संरक्षण व साक्री परिसरातील अन्नप्रक्रिया क्षेत्राला अधिक चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सर्वांनी एकत्र यावे
हजारो कोटींची गुंतवणूक आणणाऱ्या उद्योजकाला परवानग्या, जमीन मोजणी वा वीजजोडणीसाठी महिनोन्महिने थांबावे लागू नये. प्रशासकीय कामांत विलंब न होता ‘वन स्टॉप’ व्यवस्था प्रत्यक्षात उतरली पाहिजे, असे सांगत, सामंजस्य करार हे केवळ टाळ्यांसाठी नसून त्यातून प्रत्यक्ष उद्योग उभारी घेतात, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत जिल्ह्याच्या पाठीशी असून, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन व नागरिकांनी विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
---
१४-१
चौकट
उद्योग विभागाकडे मागणी
आमदार अनुप अग्रवाल यांनी जिल्ह्यातील औद्योगिक प्रगती, शक्यता व अडचणींवर प्रकाश टाकला. रावेर एमआयडीसी प्रकल्पाच्या जमिनीचा प्रस्ताव उद्योग विभागाने तत्काळ मंजूर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी परिषदेत सादरीकरणाद्वारे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा आलेख मांडला. खानदेश औद्योगिक विकास परिषदेतर्फे भरत अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.