धुळे ः टुडे १ साठी, सेकंडमेन
---
फोटो क्रमांक ः 29407
धुळे ः जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी मराठी भाषा विभागातर्फे आयोजित आढावा बैठकीच्या उद्घाटनावेळी उपस्थित साहित्यिक, कवी.
---
खानदेशी संमेलनास १५ लाखांचा निधी
अहिराणी शब्दकोशाला प्राधान्य; ‘कवितांचं गाव’ उभारणार
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ११ : मराठी भाषेसह तिच्या सर्व बोलीभाषा, साहित्य आणि संस्कृती जपण्यासाठी शासन कटिबद्ध असून, निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. खानदेशात दर वर्षी दोनदिवसीय खानदेशी संमेलन आयोजित केले जाईल आणि त्यासाठी मराठी भाषा विभागाकडून दर वर्षी १५ लाख रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी येथे आज केली.
मराठी भाषा विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यिकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष अहिरे, शशिकला पवार, रत्ना पाटील, जगदीश देवपूरकर, धुळे जिल्हा लोकसाहित्य संघाचे अध्यक्ष राम जाधव, लतिका चौधरी, संजय गिरासे, खानदेश साहित्य संघाचे अध्यक्ष सदाशिव सूर्यवंशी यांच्यासह ज्येष्ठ, युवा आणि महिला साहित्यिक उपस्थित होते.
विविध निर्णय, उपक्रम
मराठी भाषा मंत्र्यांनी सांगितले, की धुळ्यात प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या नावाने ‘कवितांचं गाव’ संकल्पना राबविली जाईल. त्यासाठी संत आणि विविध लेखकांची सुमारे दहा हजार पुस्तके मराठी भाषा विभाग देईल. पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने केवळ जागा उपलब्ध करून द्यावी; उर्वरित यंत्रणा विभाग उभी करेल. १०० व्या साहित्य संमेलनानिमित्त १०० बोलीभाषांचे शब्दकोश तयार केले जाणार असून, त्यात अहिराणीचा समावेश पहिल्या पाच प्राधान्यक्रमांत असेल. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत स्वतंत्र ‘मराठी भाषा विभाग’ सुरू करून तेथे वर्ग-१ दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाईल. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी ५०० चौरस फूट जागा व ७५० ग्रंथांचे वाचनालय उपलब्ध होईल. ‘कलाकार मानधन योजने’च्या धर्तीवर साहित्यिकांसाठी स्वतंत्र मानधन योजनेचा विचार केला जाईल. तसेच १०० व्या साहित्य संमेलनासाठी जिल्ह्यातील १० ते १५ साहित्यिकांना ‘साहित्य सहली’द्वारे पाठवले जाईल.
अहिराणी हॉल उभारणी
पालकमंत्री रावल यांनी अहिराणी साहित्यासाठी स्वतंत्र ‘अहिराणी हॉल’ उभारणे, राजवाडे संशोधन केंद्रात दुर्मीळ साहित्याचे जतन करणे आणि शासकीय ग्रंथालयांमध्ये अहिराणी पुस्तकांसाठी विशेष व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.