लाचखोर हवालदाराला चार वर्षांचा कारावास
रामचंद्र आडकेला न्यायालयाचा दणका
सकाळ वृत्तसेवा
नाशिक/जळगाव, ता. ११ : गुन्ह्यात अटक न करता परस्पर न्यायालयात हजर करण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नाशिक तालुका पोलिस ठाण्यातील हवालदाराला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. रामचंद्र राजराम आडके असे शिक्षा झालेल्या हवालदाराचे नाव आहे. न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत तीन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड, तर कलम १३ (२) अंतर्गत चार वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. दंडाची रक्कम न भरल्यास अनुक्रमे तीन महिने व चार महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
नाशिक तालुका पोलिस ठाण्यात २०१४ मध्ये तक्रारदार व त्यांच्या चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यात अटक करून पोलिस कोठडी न घेता त्यांना थेट न्यायालयात हजर करण्यासाठी हवालदार आडके यांनी २३ सप्टेंबर २०१४ ला पंचासमक्ष तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर दहा हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार, २४ सप्टेंबरला गिरणारे पोलिस दूरक्षेत्रात पंचासमक्ष दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना आडके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह पकडले. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी पूर्ण करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन कामकाजात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सचिन गोरवाडकर यांनी बाजू मांडली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास शिवाजी लोंढे, कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे, प्रभाकर गवळी व किरण धुळे यांनी कामकाज पाहिले.