मेनफिचर
शहर टुडे पान चारसाठी
--------------------
(दोन कॉलम येणार आहे)
जळगाव : वगळलेल्या मतदारांची पुन्हा पडताळणी करण्याबाबत आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या.
-----------
बीएलओंनी अपूर्ण ठेवलेले काम पूर्ण करा
------------
किरीट सोमय्या : वगळलेल्या मतदारांची पुन्हा पडताळणी करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या(एसआयआर) प्रक्रियेत शहरी भागातील काही बीएलओंकडून मतदारांची पडताळणी व्यवस्थित न झाल्याने अनेक पात्र मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली गेली आहेत. त्यामुळे जळगाव शहरातील मतदारयादी पुनरीक्षणाचे सुमारे १५ टक्के काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालेले नाही. हे अपूर्ण काम पूर्ववत करण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बूथनिहाय घरोघरी जाऊन मतदारांची पुन्हा पडताळणी करावी, असे आवाहन भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.
शहरातील मतदारयादीची प्रत्यक्ष पडताळणी करताना कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथची यादी हातात घेऊन वगळलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार करावी. संबंधित मतदार त्या पत्त्यावर वास्तव्यास आहे किंवा नाहीत, त्याचे नाव अन्य मतदारयादीत समाविष्ट आहे किंवा नाही, नाव वगळण्याचे कारण काय आहे?, याची माहिती घ्यावी. पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले असल्यास आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित अर्ज भरून घ्यावा, असे सोमय्या यांनी सांगितले. केवळ अर्ज भरून थांबू नका. संबंधित बीएलओशी सातत्याने संपर्क ठेवून वगळलेले नाव पुन्हा मतदारयादीत समाविष्ट होईपर्यंत पाठपुरावा करा. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव पुन्हा समाविष्ट करून घेणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असे निर्देश त्यांनी दिले. नवीन पात्र मतदारांची नोंदणी, चुकीने वगळलेल्या मतदारांच्या नावांचा पुनर्समावेश, पत्ता व वैयक्तिक तपशीलातील दुरुस्ती व दुबार, मृत व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या नोंदींची नियमानुसार पडताळणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जीवंत, पात्र व संबंधित भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकाचे नाव चुकीने वगळले जाणार नाही, याची दक्षता बूथप्रमुखांनी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अपूर्ण राहिलेले सुमारे १५ टक्के काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी बूथनिहाय कृती आराखडा तयार करावा, असेही सोमय्या यांनी सांगितले. मतदारयादी अचूक ठेवणे ही केवळ निवडणूक प्रशासनाची जबाबदारी नाही. प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळवून देणे ही कार्यकर्त्यांचीही जबाबदारी आहे. यापुढे केवळ मतदारयादीत नाव नसल्यामुळे एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहता कामा नये, असे सोमय्या यांनी सांगितले. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, गटनेते प्रकाश बालानी यांच्यासह नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.