ॲंकर
शहर टुडे पान तीनसाठी
------------------
मू. जे. महाविद्यालयात बुधवारी पदवी वितरण
-----
कुलगुरुंची प्रमुख उपस्थिती; गुणवंत विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : येथील मूळजी जेठा महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ येत्या बुधवारी (ता.१६) सकाळी दहाला आयोजित करण्यात आला आहे. खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र संचलित महाकवी कालिदास सभागृहात हा समारंभ होणार आहे.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय एल. माहेश्वरी उपस्थित राहतील. के.सी.ई. सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील अध्यक्षस्थानी राहतील. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रथम विद्यार्थी मंचावर
गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मंचावर गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र काउंटरवर पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना यादीतील अनुक्रमांकानुसार प्रमाणपत्रांचे वितरण केले जाईल. प्रमाणपत्र वितरणावेळी विद्यार्थ्यांना उत्तरीय परिधान करणे आवश्यक असून, १५० रुपये शुल्क भरून ते स्वतंत्र काउंटरवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
माजी विद्यार्थी मेळावा
समारंभास उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे ३१ मार्च २०२७पर्यंत कार्यालयीन वेळेत महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध राहतील. समारंभासंदर्भातील अद्ययावत सूचना महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. दरम्यान, याच दिवशी सकाळी साडेनऊला महाविद्यालयाच्या ओल्ड कॉन्फरन्स हॉलमध्ये २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा होणार आहे. यात विशेषतः द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
पोस्टर प्रदर्शनही भरणार
विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात विविध दर्शनीय वस्तू, माहितीपत्रके व पोस्टर प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. गुणवत्तायादीतील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी, त्यांचे पालक, सुवर्णपदकासाठी अनुदान देणारे दाते, या कालावधीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. केतन नारखेडे व पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे समन्वयक डॉ. भूपेंद्र केसर यांनी दिली.