मेनफिचर
शहर टुडे पान दोनसाठी
--------------
NSK26H29431
जळगाव : येथील बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी झालेली गर्दी.
-------------
NSK26H29432
गणेश मूर्ती खरेदी करताना महिला
------------
NSK26H29433 व NSK26H29434
सजावटीचे साहित्य खरेदी करताना भाविक.
----------------
गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली
-------
व्यापाऱ्यांमध्ये उत्साह; सजावटीसह पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : श्री गणेशोत्सवाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील बाजारपेठेत गणरायाच्या स्वागताची जोरात तयारी सुरू झालेली दिसून येत आहे. गणेशमूर्तींसह सजावटीचे साहित्य, पूजासाहित्य, फुलांच्या माळा, आकर्षक मखर व विद्युत रोषणाईच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांत उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.
घरगुती गणपती व सार्वजनिक गणेश मंडळांकडून सजावटीसाठी विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. रंगीबेरंगी मखर, तोरणे, फुलांच्या माळा, कागदी सजावट, विविध आकारांच्या लाइटिंग माळा, पडदे व इतर आकर्षक सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. यंदा पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंनाही ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गणेश स्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठीही नागरिकांची लगबग सुरू आहे. नारळ, सुपारी, दुर्वा, फुले, अगरबत्ती, कापूर, हळद-कुंकू, वस्त्र व पुजेसाठी लागणाऱ्या अन्य साहित्याला मागणी वाढली आहे. सकाळच्या तुलनेत सायंकाळी बाजारपेठेत मोठी गर्दी होत असून, वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे.
मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची वाढती वर्दळ पाहून व्यापाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. पुढील काही दिवसांत खरेदीला आणखी वेग येण्याची शक्यता असून, गणरायाच्या आगमनापूर्वी बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी घराघरांत व गणेश मंडळांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आली असून, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने जळगाव शहरातील वातावरण भक्तिमय होण्यास सुरुवात झालेली दिसून येत आहे.