फोटो : H29422
---
आठ वर्षीय प्रिषाकडून कैलास यात्रा
दोन दिवसांत ३२ किलोमीटरचा पायी प्रवास
नाशिक, ता. १५ : अवघ्या आठ वर्षीय प्रिषा घुगे हिने हिमालयातील खडतर मणिमहेश कैलास शिवयात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली. यासोबत तिने साहसाची, गिर्यारोहणाची जिद्द पुन्हा एकदा सिद्ध केली. यात्रा तिने आई-वडिलांसोबत तब्बल दोन दिवस पायी चालत पूर्ण केली.
प्रिषाने पहिल्याच दिवशी १३ हजार ३०० फूट उंचीवरील गौरीकुंड गाठले. विरळ ऑक्सिजन, खडतर चढाई आणि दगडी वाटा अशा आव्हानांना न जुमानता तिने हा संपूर्ण टप्पा एका दिवसात पायी पार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे गौरीकुंडातील ४ ते ५ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात स्नान करून तिने पुढील प्रवासाला सुरुवात केली. चौथ्या श्रावण सोमवारी सूर्योदयाच्या वेळी १३ हजार ८०० फूट उंचीवरील शिवकुंडातून मणि स्वरूपात दर्शन देणाऱ्या मणिमहेश कैलास पर्वताचे दर्शन घेतल्यानंतर प्रिषाने पुन्हा तब्बल १६ किलोमीटरचा उतार पायी पार केला. आई-वडिलांसोबत दोन्ही दिवस सुमारे १३-१३ तास पायी चालत तिने ही अवघड यात्रा पूर्ण केली. प्रिषाची गिर्यारोहणाची ही पहिलीच कामगिरी नाही. अवघ्या चौथ्या वर्षी तिने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई सर केले होते. तिचे वडील पंकज घुगे हे जल्लोष ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य आहेत.