टुडे एकसाठी
-------------
जळगावात दीड लाखाचे मांस जप्त
--------
पोलिसांच्या कारवाईत मास्टर कॉलनीतून पाच संशयितांना अटक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : शहरातील मास्टर कॉलनी व कुरेशी मोहल्ला परिसरात बेकायदेशीरपणे गोवंश जनावरांची कत्तल विक्रीसाठी ठेवलेल्या अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे एक लाख ५३ हजार ६०० रुपयांचे ५७० किलो मांस व कत्तलीसाठी लागणारे साहित्य जप्त करीत पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.
येथील मास्टर कॉलनी व कुरेशी मोहल्ला परिसरात बेकायदेशीर गोमांस बाळगून त्याची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी छापा टाकला. पथकाला विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले सुमारे ५७० किलो गोमांस व कत्तलीचे साहित्य आढळून आले. पोलिस नाईक विशाल सुभाष कोळी (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता.११) सायंकाळी ६.२३ला एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित शेख शोएब फिरोज (वय २६, रा. अक्सानगर, मेहरुण, जळगाव), शेख ताबिश शेख आरिफ कुरेशी (२४, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), कलीम हनीफ कुरेशी (४३, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), शेख फैजान शेख मुख्तार (वय २५, रा. उमर मशिदीजवळ, जळगाव) आसिफ आरिफ कुरेशी (वय २८, रा. उमर मशिदीजवळ, जळगाव) या पाच संशयितांना घटनास्थळावरच रंगेहात पकडण्यात आले. यावेळी एक संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.