गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर
वाळू उपसा करणारे वाहने जप्त
---------
दोन वेगवेगळ्या कारवाईत ट्रॅक्टरसह डंपरचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : येथील रामानंदनगर पेालिस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टर व जळगाव तालुका पेालिस ठाण्याच्या हद्दीतून वाळूची अवैधपणे वाहतूक करणारे एक डंपर ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही वाहनांच्या चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील नंदगाव येथील गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करणारे विनाक्रमांकांच्या डंपरमध्ये कोणत्याही शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असताना पोलिस पथकाला आढळून आला. पोलिस नाईक प्रवीण हिलाल कोळी (वय ४०) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक दीपक देवराम चौधरी करीत आहेत. अद्याप संशयिताला अटक झालेली नाही.
दरम्यान, रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुलाब बाबा टेकडी परिसरातील १०० फुटी रोडवर विनापरवाना अवैधपणे वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ बीजी ६४४) रामानंदनगर पोलिसांनी जप्त केला आहे. संशयित नंदकिशोर हरी भोई (वय ३५) या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन रनशेवरे करीत आहेत.