रिसॉर्टवर गेलेल्या तरुणाचा
विजेच्या धक्क्याने मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : गंगापूर-गोवर्धन शिवारातील रिसॉर्टवर कुटुंबीयांसह सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. स्वीमिंग पूलमध्ये उडी मारण्यासाठी हा तरुण पत्र्यावर चढला असताना उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे कुटुंबीयांचा आनंदाचा क्षण दुःखात बदलला.
तेजस संजय जगताप (वय २७, रा. गायकवाड कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, सातपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर-गोवर्धन शिवारातील समृद्धी रिसॉर्ट गायकवाड कुटुंबीयांनी शुक्रवारी (ता. ११) बुक केले होते. रात्री कुटुंबीयांसह रिसॉर्टवर असताना मध्यरात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान तेजस स्वीमिंग पूलमध्ये उडी मारण्यासाठी शेजारील पत्र्यावर चढला. उडी मारण्याच्या तयारीत असतानाच पत्र्याजवळून जाणाऱ्या महावितरणच्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचा त्याला स्पर्श झाला. वीजवाहिनीचा स्पर्श होताच तेजसला जोरदार विजेचा धक्का बसला. त्यात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. पहाटे तीनच्या सुमारास त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावित यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मृदुला नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.