मेन
फोटो : H29448, H29449, H29451, H29452, H29437
-------------------------
अपुऱ्या फेऱ्या, बसस्थानकही भकास
एसटी महामंडळाचा ढिसाळ कारभार; प्रवाशांचा जीव टांगणीला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : प्रशासकीय सोयीसाठी वारंवार होणारे बदल... बसस्थानकांवर काम सुरु असताना सुरक्षा मानकांचे होणारे उल्लंघन तसेच अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड.. अशा एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांचे पुरते हाल होत आहेत. अपुऱ्या बस फेऱ्या व बसस्थानकांवरील गैरसोयींमुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत निदर्शनात आले आहे.
निमाणी बसस्थानकावरुन सुरू असलेली बससेवा आता मेळा, नवीन सीबीएस व महामार्ग बसस्थानकावरून सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता.११) प्रवाशांना या बदलामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. हीच परिस्थिती शनिवारी (ता. १२) कायम असल्याचे पाहणीतून आढळले. बस फेऱ्यांची संख्या तोकडी असल्याने, प्रवाशांना ताटकळत बसस्थानकावर उभे राहावे लागत होते. विशेषतः धुळे, पुणे या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट मिळविण्यासाठीच्या रांगेतच तासन्तास वेळ वाया घालविण्याची वेळ ओढवली होती. इतर ठिकाणच्या बसगाड्यांमध्येही जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना कधी खिडकीतून तर कधी चालकाच्या दरातून असुरक्षितरीत्या बसमध्ये प्रवेश केला जात असल्याचेही पाहणीत आढळले.
---चौकट
नवीन सीबीएसला
प्रसाधगृहातून वसुली
राज्यात बहुतांश सर्वच बसस्थानकांमध्ये शासनाच्या धोरणानुसार मोफत प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध आहे. परंतु नवीन सीबीएस बसस्थानकावर आजही पैसे आकारले जात आहेत. ठेकेदाराशी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, त्यांच्या वादामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. बसस्थानकाच्या परिसरात प्रचंड अस्वच्छतेचे वातावरण असून, नियमित स्वच्छतेची मागणी होते आहे. कचरा कुंडी गच्च भरल्याने कचरा आजूबाजूला कचरा सांडला असल्याचेही आढळले.
-------------चौकट
मेळा बसस्थानकात खड्डे
बसस्थानकाचे उद्घाटन होऊन साधारणतः अडीच वर्ष झाले असतांना, बसस्थानकात केलेल्या काँक्रीटीकरणात ठिकठिकाणी खड्डे झाले आहेत. शरणपूर रोडच्या बाजूचे प्रवेशद्वार खुले नसल्याने प्रवाशांचा त्रांगडे होते. अंतर्गत रस्त्याचे काम सुरु असल्यानेदेखील प्रवाशांना वळसा घालून बसस्थानकात यावे लागत आहे. या ठिकाणी असलेल्या केंद्रात एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी रोज प्रवाशांनी मोठी रांग लागते.
---
महामार्ग बसस्थानकावर प्रवासी चोरी
महामार्ग बसस्थानकावर प्रवासी प्रतीक्षालय उभारणीसह इतर विविध कामे सुरु आहेत. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा मानकांचे पालन होत नसल्याचे आढळले. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका असल्याचेही दिसले. बसस्थानक परिसरातून सर्रासपणे प्रवासी चोरी केली जाते आहे. एसटी महामंडळासह पोलिस यंत्रणेच्या डोळ्यासमोर हा प्रकार घडतो आहे.
--