डॉ. नीलेश जेजूरकर यांचा
अटकपूर्व जामीन फेटाळला
---
डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्या प्रकरणात अटकेची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांचे पती व जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे गंगापूर पोलिसांकडून त्यांच्या अटकेची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाबाबत न्यायालयाने गंभीर निरीक्षणे नोंदवत डॉ. मनीषा जेजूरकर यांचा मृत्यू आत्महत्या की अन्य प्रकारे झाला, याबाबतही प्रश्न उपस्थित केला.
ता. ६ मार्च २०२६ ला गंगापूर रोडवरील डी. के. नगर परिसरातील रेवती ब्लू अपार्टमेंटमधील राहत्या घरात डॉ. मनीषा जेजूरकर (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांच्या भगिनी रोहिणी वैभव थोरात यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात पती डॉ. नीलेश जेजूरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर डॉ. जेजूरकर फरारी झाले होते. सध्या ते पुन्हा शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.
या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर डॉ. जेजूरकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. माधव जामदार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. बचाव पक्षाने या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने ही मागणीही फेटाळली.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या मृत्यूबाबत काही गंभीर निरीक्षणे नोंदवली. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता महत्त्व प्राप्त झाले आहे.
ॲड. अनिकेत निकम व अभिलाषा पवार यांनी बचाव पक्षातर्फे, सरकारी अभियोक्ता स्वप्नील वाळवे यांनी शासनातर्फे, तर ॲड. अभयसिंह भोसले, अंकुर पहाडे व संजय कोकणे यांनी मूळ फिर्यादीतर्फे युक्तिवाद केला.