दारणाची दारे दीड महिन्यानंतर बंद

दारणाची दारे दीड महिन्यानंतर बंद
Published on
दारणा प्रकल्प दीड महिन्यांनी ‘शांत’; गंगापूरसह नऊ धरणांतून विसर्ग सुरू जिल्ह्यातील २६ प्रमुख प्रकल्पांत ९६.३६ टक्के साठा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असताना दारणा धरणाची दारे तब्बल दीड महिन्यांनंतर शुक्रवारी (ता. ११) बंद करण्यात आली. मात्र, गंगापूरसह नऊ धरणांमधून विसर्ग सुरूच आहे. जिल्ह्यातील २६ प्रमुख प्रकल्पांमध्ये सध्या ९६.३६ टक्के पाणीसाठा आहे. मॉन्सूनचे साडेतीन महिने पूर्ण होत असताना जिल्ह्यात पावसाचा लहरीपणा अनुभवायला मिळाला. जूनमध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावली; मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये दमदार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. जिल्ह्यातील प्रमुख २५ धरणांमध्ये सध्या ६८ हजार ५२ दलघफू पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत हा साठा ९१ टक्के होता. सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरणांमधील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून गेल्या दीड महिन्यापासून विसर्ग सुरू होता. शुक्रवारी सायंकाळी धरणाची दारे बंद करण्यात आली. धरणात सध्या ७ हजार ६० दलघफु, म्हणजेच ९८.७६ टक्के साठा आहे. नाशिककरांची ‘लाइफलाइन’ असलेल्या गंगापूर धरणातही जवळपास पूर्ण क्षमतेने पाणीसाठा असून त्यातून ३५६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भावली, ओझरखेड, वाघाड, तिसगाव, वालदेवी, भाम, आळंदी आणि काश्‍यपी या धरणांमधूनही विसर्ग कायम आहे. विसर्ग (क्युसेक) गंगापूर : ३५६, भावली : ७३, ओझरखेड : ८, वाघाड : ११०, तिसगाव : २०, वालदेवी : ६५, भाम : ११७, आळंदी : ३०, काश्‍यपी : १५०. जायकवाडीत ५५.४९ टीएमसी पाणी जिल्ह्यातील धरणांमधून यंदा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने नांदूरमध्यमेश्वरमार्गे हे पाणी मराठवाड्यातील जायकवाडी जलाशयाकडे पोहोचले. जूनपासून आतापर्यंत नाशिकमधून ५५ हजार ४९३ दलघफू म्हणजेच ५५.४९ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचले आहे. त्यामुळे जायकवाडीतील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com