धुळे ः टुडे २ साठी, मेन
--
फोटो क्रमांक ः 29478...जयकुमार रावल
--
जिल्ह्यात २२१६ कोटींतून महामार्गांचा विकास!
-
पालकमंत्री रावल : अपघातप्रवणस्थळी अंडरपास, उड्डाणपूल कामांनाही प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ : जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग हे केवळ दळणवळणाचे मार्ग नसून उद्योग, व्यापार, शेती आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे महत्त्वाचे दुवे आहेत. त्यामुळे महामार्गांची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. विशेषतः अपघातप्रवण ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अंडरपास, उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांची कामे वेगाने मार्गी लावावीत. तसेच भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन प्रस्तावित महामार्ग प्रकल्पांच्या कार्यवाहीला गती द्यावी, असे स्पष्ट निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. तसेच सर्व प्रकल्पांचा एकत्रित विचार केल्यास महामार्ग विकासासाठी दोन हजार २१६ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धुळे प्रकल्प अंमलबजावणी युनिटअंतर्गत सुरू असलेल्या तसेच २०२६-२७ मध्ये प्रस्तावित विविध महामार्ग प्रकल्पांचा पालकमंत्री रावल यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
-
उपाययोजनांवर भर
महामार्गांवरील वेगवान वाहतुकीसोबतच स्थानिक नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे सांगत पालकमंत्री रावल यांनी अपघातप्रवण ठिकाणांवर तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर दिला. पळासनेर, वाघाडी आणि सांगवी येथे अंडरपास उभारण्यासह दोन ब्लॅकस्पॉट आणि सात अपघातप्रवण ठिकाणी सुधारात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. सुमारे २.९८८ किलोमीटर लांबीच्या या कामासाठी ६४ कोटी ९१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही कामे पूर्ण करताना स्थानिक नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था उपलब्ध होऊन अपघातांचा धोका टळेल, यादरम्यान कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
-
अन्य प्रस्तावांचा आढावा
महामार्गालगतच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरवड फाटा, गोराणे फाटा आणि सावळदे फाटा येथे प्रस्तावित अंडरपासच्या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) लवकर पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. तसेच जळगाव ते नाशिक या सुमारे २०० किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रस्तावाचा आढावा घेत प्रादेशिक दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी या मार्गाचा पाठपुरावा गतिमान ठेवण्यास सांगण्यात आले. महामार्ग प्रकल्पांमध्ये कामांचा वेग, उच्च दर्जा आणि नागरिकांची सुरक्षितता या तिन्ही बाबींना समान प्राधान्य द्यावे. प्रत्येक सुरू असलेल्या कामाचा नियमित आढावा घेऊन प्रलंबित अडचणी समन्वयातून सोडवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी यंत्रणांना केले.
-
१४-१
...चौकट...
१४-१
दोन हजार कोटीतून सीमा महामार्ग
कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-मध्यप्रदेश सीमा हा प्रस्तावित महामार्ग जिल्ह्याच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असून, या प्रकल्पाच्या कार्यवाहीला विशेष प्राधान्य देण्याचे निर्देश मंत्री रावल यांनी दिले. कुसुंबा ते महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेपर्यंत सुमारे १६५ किलोमीटर लांबीचा चारपदरी प्रवेश नियंत्रित राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित आहे. यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यात ३०० कोटी रुपये भूसंपादनासाठी तर १ हजार ७०० कोटी रुपये बांधकामासाठी प्रस्तावित आहेत. या प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागाची संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, शेतमाल व औद्योगिक मालाच्या वाहतुकीला मोठा वेग मिळणार आहे.
-
१४-१
....चौकट...
१४-१
प्रमुख प्रकल्पांचे नियोजन, खर्च
फागणे ते पारोळा चौफुली : - ५.२९ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाच्या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी ३५.८१ कोटी खर्च होणार असून, कामाचा दर्जा राखून ते निर्धारित कालावधीत पूर्ण करावे. एसआरपीएफ, अकलाड-मोराणे व तामसवाडी : - या तीन ठिकाणी अंडरपाससह इच्छापूरजवळ सर्व्हिस रस्त्याचे काम ४.३६ किलोमीटर लांबीत होणार असून, यासाठी ७३.१० कोटी खर्च अपेक्षित आहे. साक्री-शेवाळी जंक्शन : - वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १.९२ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोडच्या कामासाठी ४२.१० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी दिली.