गावांचा कारभारी नव्या वर्षातच
एसआयआरमुळे गावांचा कारभार लांबणीवर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : राज्यातील मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामुळे (एसआयआर) ग्रामपंचायत निवडणुकांना विलंब होणार आहे. एसआयआरअंतर्गत ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने दिवाळीनंतर, नोव्हेंबरअखेर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून, गावांना नवे कारभारी मिळण्यासाठी नव्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.
राज्यात यंदा मुदत संपलेल्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६२१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपल्याने गावपातळीवरील विकासकामांवर परिणाम होत आहे. कार्यकारिणीअभावी विकासकामे संथगतीने सुरू असून, महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.
मात्र, सध्या निवडणूक यंत्रणा एसआयआरच्या कामात व्यस्त आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसह राज्यात एसआयआरचा दुसरा टप्पा सुरू आहे. प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार असल्याने नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जानेवारी २०२७मध्ये गावांना नवे कारभारी मिळण्याची शक्यता आहे.
प्रशासकांची नियुक्ती
दरम्यान, ग्रामविकास विभागाने तीन दिवसांपूर्वी मुदत संपलेल्या, तांत्रिक अडचणींमुळे निवडणुका न झालेल्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले आहेत. कृषी, आरोग्य, शिक्षण व पंचायत विभागातील विस्तार अधिकारी किंवा अन्य शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करता येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक होईपर्यंत किंवा सहा महिन्यांपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत प्रशासकांचा कार्यकाळ राहणार आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार काही प्रमाणात सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.