फोटो : H29479
नाशिक : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले संशयित. समवेत शहर नाशिकरोड गुन्हे शाखा युनिटचे पथक.
---
घरफोड्या करणारी मुंबईची सराईत टोळी गजाआड
नाशिक रोड गुन्हे शाखेची कारवाई; ११ गुन्ह्यांची उकल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : नाशिक रोड गुन्हे शाखा युनिटने तांत्रिक तपासाच्या आधारे मुंबईतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ सराईतांना अटक केली असून, तब्बल २४ लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात २०० ग्रॅम सोन्याची लगड, वाहने आणि घरफोडीसाठी लागणाऱ्या हत्यारांचा समावेश आहे. या कारवाईमुळे नाशिक शहर व परिसरातील ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
२० ऑगस्टला जेल रोडच्या योगेश्वर नंदन अपार्टमेंटमध्ये घरफोडी झाली होती. याचा समांतर तपास नाशिक रोड गुन्हे शाखा करीत होती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांना मानखुर्द, मुंबई येथील संशयित वाहनाचा माग मिळाला. त्याआधारे पोलिसांनी छापा टाकून संजय कांबळे उर्फ सलीम शेख (४५, रा. खर्डीगाव, दिवा, कल्याण) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून अन्य साथीदार शिर्डी- मनमाड मार्गाने नाशिककडे येत असल्याचे समजताच आडगाव ट्रक टर्मिनल परिसरात सापळा रचून विनोद पवार (४८, रा. कुलाबा, मुंबई), तौसिफ गोरमे (४१, रा. मुरुड जंजीरा, रायगड) या साथीदारांना जेरबंद केले.
संशयितांनी मुंबई आणि विरार येथे विकलेले २०० ग्रॅम सोने पोलिसांनी लगडीच्या रूपात जप्त केले आहे. अटक करण्यात आलेले सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर मुंबई व परिसरात यापूर्वी १५ ते १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे संशयित दिवसा व रात्री घरफोडी केल्यानंतर झोपण्यासाठी स्वतःच्या चारचाकी गाडीचा वापर करत असत. इंदिरानगर ४, नाशिक रोड ३, उपनगर २ , देवळाली कॅम्प १ आणि कर्जत, रायगड येथील १ असे ११ गुन्हे उघडकीस आले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी संदीप पवार, हरसिंग पावरा, गुंडाविरोधी पथकाचे सहायक उपनिरीक्षक सुनील आडके, विजयकुमार सूयर्वंशी, अक्षय गांगुर्डे, प्रदीप ठाकरे व पथकाने ही धडक कारवाई पार पाडली.