‘एआय’ला मानवी चेहरा द्या!
डॉ. सदानंद मोरे : लहान मुलांना कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर ठेवण्याचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : शिक्षण व्यवस्थेला कृत्रिम चेहरा न देता मानवी चेहरा असायला हवा. लहान मुलांच्या बुद्धीचा विकास होईपर्यंत त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करू देऊ नये, असा सल्ला संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी दिला. शिक्षकांचा संबंध ग्रंथाशी असल्याने ग्रंथालयाच्या माध्यमातून मिळणारा पुरस्कार हा गौरवास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक वाचनालयाच्या ५७व्या नागरिक शिक्षक गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते.
भारतीय संस्कृतीत गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण असून, भारतीय परंपरेतील कथांमधून ते अधोरेखित झाले आहे. आजच्या एआयच्या युगात तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवी संवेदना आणि विचारशक्ती जपणे गरजेचे असल्याचे मोरे यांनी नमूद केले.
‘रामराज्याची दुसरी राजधानी नाशिक’
नाशिकची ओळख केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नाही. प्रभू श्रीरामाचे नाशिकमध्ये वास्तव्य होते. रामाचा पहिला अभिषेक भरताने केल्याचा दाखला देत अयोध्या ही रामराज्याची पहिली, तर नाशिक दुसरी राजधानी असल्याचे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले. रामायणातील विविध प्रसंग त्यांनी उदाहरणांसह उलगडले.
पुरस्कार निवड समितीत प्रा. डॉ. बी. जी. वाघ, राजेंद्र निकम, प्रा. दिलीप फडके, संजय करंजकर आणि गिरीश नातू यांनी काम पाहिले. यावेळी उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुनील कुटे, वैद्य विक्रांत जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. देवदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी आभार मानले.
पुरस्कारार्थी
प्राथमिक : कविता वडघुले, हेमलता भामरे, सुमित्रा मसलेकर, प्रीतम धनाईत.
माध्यमिक : सुनील बस्ते, विलास देवरे, मनिषा दिघे, दयावंती मते.
मुख्याध्यापक : भारती पाटील, सरला सानप.
सेवानिवृत्त : उर्मिला वाटवे, देवकिसन व्यास, प्राचार्य के. आर. शिंपी.
उच्च माध्यमिक : प्रा. डॉ. कैलास शिंदे.
महाविद्यालयीन : प्रा. मयुरा पाटील, प्रा. डॉ. संजय वाकचौरे, प्रा. डॉ. जयश्री पाटील.
व्यावसायिक : प्रा. डॉ. विलासकुमार देशमुख.
संशोधन प्राध्यापक : प्रा. डॉ. सुजाता मार्तंड.
विज्ञान प्रसार : प्रा. व्ही. डी. बर्वे.
संत साहित्य : प्रा. डॉ. यशवंतराव पाटील.
विशेष कार्य : अमित निगळ, प्रा. वैशाली चौधरी.
लोककला : सुनील ढगे.
शास्त्रीय संगीत : डॉ. ज्ञानेश्वर कासार.
विशेष चित्रकला : सुमतीलाल बागडे.
कला शिक्षक : संजय जगताप.
क्रीडा शिक्षक : सुरेश कोकाटे.