जळगाव, धुळे जिल्ह्यात पावासाची हजेरी
जळगाव, ता. १२ : तब्बल महिन्याभराच्या खंडानंतर शुक्रवार (ता.११) व शनिवारी (ता.१२) जळगाव आणि धुळे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कोमेजणाऱ्या खरीप हंगामातील शेतपिकांना काही प्रमाणात का होईना या पावसाने दिलासा मिळाला आहे.
यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात जून मध्ये सात दिवस ६० ते ६८ टक्के, जुलैत दहा-बारा दिवसांचा खंड घेत महिन्याच्या शेवटी जोरदार पर्जन्यवृष्टी करीत सरासरी १३५ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, ऑगस्टमध्ये केवळ सहा दिवस कमीअधिक प्रमाणात पाऊस होऊन पुन्हा दीर्घ खंड घेतला होता. सप्टेंबरच्या मध्यात शुक्रवारी(ता.११) सायंकाळनंतर जोरदार पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेल्या २४ तासांत जळगाव शहरासह तालुका परिसरात सर्वांत जास्त ३६.२ मिलमिटर पाऊस झाला. चाळीसगाव तालुक्यात पावसाने पाठ फिरवीत ०.७ मिलीमिटर पाऊस झाला.
धुळे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. तब्बल २८ दिवसांच्या विश्रांतीनंतर पिंपळनेर शहर व परिसरात पावसाने शनिवारी पहाटे वातावरणात अचानक बदल होऊन आकाश ढगांनी भरून आले. त्यानंतर परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक जाणवला, तर काही भागात रिमझिम स्वरूपात पाऊस झाला.
महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिरपूर शहरासह परिसराला शुक्रवार (ता.११) रात्रीपासून पावसाने झोडपून काढले. रात्री सुरू झालेला पाऊस शनिवारी (ता.१२) देखील दिवसभर जोरदार बरसला. शहरातील करवंद नाका परिसर पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः जलमय झाला. तेथील राजपाल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यात पाणी शिरल्याने दुकानदारांची धावपळ उडाली. पालिकेच्या कर्मचार्यांसह संबंधित दुकानदारांनी पंपाच्या साहाय्याने तळमजल्यातील पाणी बाहेर काढले. याच भागातील हुलेसिंग नगर परिसरातही सखल भागात पाणी साठले. इदगाह नगर परिसरात गटारीमधून पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने परिस्थिती बिकट झाली.