धुळे ः टुडे १ (३) साठी, मेन
--
फोटो क्रमांक ः 29484
धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांना मागण्यांचे निवेदन देताना औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी.
---
साक्रीला ६५ हेक्टर नवी ‘एमआयडीसी’!
-
उद्योगमंत्री सामंत : अवधान, नरडाणा वसाहतीसाठी १७ कोटींचा निधी मंजूर
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ : जिल्ह्यात उद्योगवाढीला गती देण्यासाठी आवश्यक पाणी, वीज, रस्ते व अग्निशामक यासह सर्व पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच, उद्योजकांच्या अडीअडचणी स्थानिक पातळीवर तातडीने सोडवून प्रलंबित औद्योगिक विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच साक्रीला ६५ हेक्टर क्षेत्रात नवीन ‘एमआयडीसी‘ स्थापन होईल आणि त्यासाठी मोजणीचा आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
-
जिल्हाधिकारी कार्यालयात येथील उद्योजक, औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. मंत्री सामंत, पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार मंजुळा गावित, अनुप अग्रवाल, राघवेंद्र भदाणे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-
मंत्र्यांचे प्रमुख निर्णय
येथील उद्योजक आणि विविध औद्योगिक संघटनांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर उद्योगमंत्र्यांनी जाहीर केलेले निर्णय असे : नवीन औद्योगिक वसाहती- रावेर येथील वन विभागाची जमीन नवीन औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जात आहे. तसेच आमदार मंजुळा गावीत यांच्या मागणीनुसार साक्री मतदारसंघात ६५ हेक्टर जागेवर एमआयडीसी विकसित करण्यासाठी मोजणीचे आदेश. पायाभूत सुविधा- अवधान औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी ७ कोटी रुपये, तर नरडाणा एमआयडीसीमधील रस्त्यांच्या दुरुस्ती व सुधारणेसाठी १० कोटी रुपये, असा एकूण १७ कोटींचा निधी मंजूर, याद्वारे कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश. अवधान अग्निशामक केंद्र- अवधान औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून, एका महिन्याच्या आत त्याचे लोकार्पण.
-
उद्योजकांसाठी दरबार
पाणीपुरवठा व प्रशासकीय इमारती- हरणमाळ पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे वेगाने पूर्ण करून ती ऑक्टोबरअखेर कार्यान्वित. तसेच नरडाणा एमआयडीसीच्या प्रशासकीय इमारतीचे काम पुढील १५ दिवसांत पूर्ण करून उद्घाटन करण्याचे निर्देश. अखंडित वीजपुरवठा- उद्योगांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी आवश्यक सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय, महावितरण व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. उद्योग जनता दरबार- उद्योजकांना छोट्या-मोठ्या समस्यांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी जनता दरबाराच्या धर्तीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस (दुपारी ३ ते ५) उद्योजकांसाठी राखीव ठेवावा, अडीअडचणींवर कालबद्ध निर्णय घ्यावेत, असे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले.
-
पालकमंत्र्यांचे निर्देश
उद्योजकांच्या न्याय्य अडचणी सोडविण्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हलगर्जीपणा किंवा वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची बाजू गांभीर्याने घेतली जाईल, असा इशारा पालकमंत्री रावल यांनी दिला. तसेच अवधान व नरडाणा वसाहतीमधील वीजपुरवठा, पाण्याचा निचरा आणि दळणवळणाच्या समस्यांवर संयुक्त पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
-