फोटो - NSK26H29486
उदापूर (नागपूर) :महानिर्मितीचा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला, त्याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., विलास मोटघरे, संजय कुऱ्हाडे, अभय हरणे, मनेष वाघिरकर, राजेश पाटील, विजय राठोड आदी.
महानिर्मितीचा सौर प्रकल्प कार्यान्वित
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : महानिर्मितीने उभारलेल्या उदापूर (नागपूर) येथील १०० मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते हा प्रकल्प पहिल्यांदा ग्रीडशी जोडण्यात आला. त्यामुळे महावितरणला पुरेशी हरित ऊर्जा उपलब्ध होणार आहे.
राज्याची हरित ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी महानिर्मितीने ४१० एकरांवर उभारलेल्या या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज १३ किमी लांबीच्या डबल सर्किट वाहिनीद्वारे वरूड-कळमेश्वर २२० केव्ही वाहिनीला जोडण्यात आली आहे. राज्याच्या २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतांतून घेण्याच्या उद्दिष्टाला अनुरूप महानिर्मितीने व्हिजन २०३५ आखले आहे. त्याअंतर्गत ३२ गिगावॉटहून अधिक स्थापित क्षमतेचे लक्ष्य असून, २०३० पर्यंत आठ गिगावॉट आणि २०३५ पर्यंत १२ गिगावॉट सौर प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे महानिर्मितीची सौरऊर्जा निर्मितीची स्थापित क्षमता १.४ गिगावॉटहून अधिक झाली आहे. या प्रसंगी संचालक (प्रकल्प) राजेश पाटील, कार्यकारी संचालक (प्रकल्प)विवेक रोकडे, कार्यकारी संचालक (सौर, न.ऊ.प्र) गिरीश कुमारवार, कार्यकारी संचालक (संचलन) विलास मोटघरे तसेच मुख्य अभियंता (महापारेषण) सतीश अणे यांची विशेष उपस्थिती लाभली.