धुळे : टुडे पान २ साठी...
---
फोटो क्रमांक : 29472
कर्ले (ता. शिंदखेडा) : जीर्ण झालेला जुना गावदरवाजा कोसळल्यानंतर त्याच्याखाली साचलेला राडारोडा आणि धोकादायक स्थितीत लटकलेला भाग.
---
कर्ले गावदरवाजा कोसळला; जीवितहानी टळली
लालफितीच्या कारभारामुळे दीड वर्षांपासून पाडकाम राहिले प्रलंबित
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ : कर्ले (ता. शिंदखेडा) येथील अत्यंत जीर्ण आणि धोकादायक झालेला जुना गावदरवाजा अचानक कोसळल्याची घटना घडली. दुर्घटना घडली त्या वेळी परिसरात कोणतीही वर्दळ नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे गावदरवाजाच्या उर्वरित धोकादायक बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या उदासीन कारभाराबद्दल ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हा ऐतिहासिक व जुना गावदरवाजा अत्यंत जीर्ण झाला होता. ग्रामपंचायत कर्लेच्या वतीने दीड वर्षांपूर्वी १३ जानेवारी २०२५ ला झालेल्या सभेत या जीर्ण वास्तूच्या निर्लेखनाचा अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावानुसार पाडकामाचा प्रस्ताव संबंधित प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता. परंतु तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटूनही प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. जर प्रशासनाने वेळीच पावले उचलली असती, तर ही दुर्घटना टळू शकली असती, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. वास्तूचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच कर्ले गावाच्या सरपंच तथा प्रशासक सीमा दिनेश ठाकरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसराची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. तसेच या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना तातडीने पत्र पाठवून हा धोकादायक गावदरवाजा तत्काळ पाडण्याची मागणी केली आहे.
दुर्घटना घडल्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने पावले उचलत परिसराची सुरक्षा वाढविली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणीही त्या धोकादायक इमारतीजवळ जाऊ नये, यासाठी तिथे ‘धोकादायक इमारत-प्रवेश करू नये’ असा इशारा फलक लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही मोठी समाधानाची बाब आहे. परंतु प्रशासनाने आता कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने निर्णय घ्यावा आणि ही धोकादायक वास्तू त्वरित हटवावी, अशी मागणी सरपंच तथा प्रशासक सीमा ठाकरे यांनी केली आहे. उरलेला धोकादायक भाग तातडीने पाडण्यात यावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.