ॲंकर
टुडे पान एकसाठी
-------------
लोगो : जळगाव जिल्हा परिषदेची इमारत
-----------------------------------
घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना सक्ती
----
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंमलबजावणीबाबत जि.प. सीईओंचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : ग्रामीण भाग स्वच्छ, निरोगी व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षण अधिनियमाअंतर्गत अधिसूचित घनकचरा व्यवस्थापन नियमांच्या देशभरातील प्रभावी अंमलबजावणीबाबत गंभीर दखल घेत कालबद्ध निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत ग्रामपंचायतींना सक्ती केली आहे.
ग्रामीण भागातील स्वच्छता व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या हद्दीतील गावांत प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारून त्याची नियमित अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी किमान एक पूर्णवेळ कर्मचारी उपलब्ध करून द्यावा. गावांत वर्षांनुवर्षे साचलेल्या जुन्या कचऱ्याची (लेगसी वेस्ट) शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून संबंधित जागांच्या पुनरुज्जीवनाची कार्यवाही हाती घ्यावी.
सेंद्रीय खतनिर्मितीवर भर
घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार घराघरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला, सुका व इतर प्रकारांत स्रोतस्तरावरच वर्गीकरण करण्याची व्यवस्था निर्माण करावी. प्रत्येक गावात कचरा वर्गीकरणासाठी आवश्यक सेग्रिगेशन शेड उभारावे. ओल्या कचऱ्यापासून नाडेप खड्डे किंवा इतर शास्त्रोक्त पद्धतींच्या माध्यमातून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यावर भर द्यावा. गावातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी झाकलेली घंटागाडी किंवा आवश्यक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
नियमित अहवाल बंधनकारक
उपक्रमाच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी दर १५ दिवसांनी प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालबद्ध निर्देशांची पूर्तता करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हलगर्जीपणा चालणार नाही. घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार आवश्यक ती कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
-------
कोट
ग्रामीण भाग स्वच्छ, निरोगी व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने कचरा वर्गीकरण, संकलन, प्रक्रिया व विल्हेवाट याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छ व सुंदर गाव संकल्पना निश्चितपणे प्रत्यक्षात आणता येईल.
- करिश्मा नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.